Breaking News

राज्यात कोरोनाचे रॅकेट

  • पॉझिटिव्ह रुग्णाला निगेटिव्ह ठरविण्यासाठी दलाल सक्रिय
  • विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांचा गौप्यस्फोट

औरंगाबाद : प्रतिनिधी
कोरोनाच्या पॉझिटिव्ह रुग्णाला निगेटिव्ह करून देणारी दलालांचे रॅकेट राज्यात सक्रिय आहेत. भिवंडीत काही सामाजिक कार्यकर्त्यांनी हा महाभयंकर प्रकार नुकताच उघडकीस आणला आहे, असा धक्कादायक गौप्यस्फोट विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. राज्य सरकारने याची गंभीर दखल घ्यायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी विरोधी पक्षनेते दरेकर रविवारी (दि. 7) औरंगाबादमध्ये आले होते. वैद्यकीय व जिल्हा प्रशासनाच्या अधिकार्‍यांसमवेत बैठक घेऊन त्यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राज्यात कोरोना संसर्गाच्या साथीची परिस्थिती भयंकर आहे. राज्यात दलालांची अनेक रॅकेट्स सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. एखाद्या रुग्णाचा रिपोर्ट कुठल्या हॉस्पिटलला पाठवायचा याचा निर्णय हे दलाल घेत आहेत. त्यांची रुग्ण, डॉक्टर आणि रुग्णालयांशी ’डील’ झालेली असते, मात्र हे महाभयंकर प्रकार राज्य सरकारला माहीतही नाहीत, असे दरेकर म्हणाले. मुंबईसारख्या ठिकाणी आतापर्यंत केवळ दुर्लक्षामुळे अनेक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ऑक्सिजनची यंत्रणा नाही. रुग्णवाहिका नाही आणि व्हेंटिलेटरही नाही, अशी मुंबईची अवस्था आहे, असेही त्यांनी नमूद केले.
’सर्वसामान्य माणूस आर्थिकदृष्ट्या उद्धवस्त झाला आहे. त्याला प्रचंड त्रास होत आहे. हॉस्पिटलची बिले परवडत नाहीत. लॅबवरही सरकारचा कंट्रोल राहिलेला नाही. खासगी रुग्णालये रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा बिल घेत आहेत. सरकारच्या कारवाईच्या इशार्‍याला ते भीक घालत नसल्याचे दिसत आहे. सरकारने याची दखल घेतली पाहिजे. लोकांना खासगी रुग्णालयांनी घेतलेल्या च्या पैशाचा परतावा दिला पाहिजे, अशी मागणी  दरेकर यांनी केली.
स्वत:चे अपयश लपविण्यासाठी भाजपवर आरोप
’सरकारच्या चुका लक्षात आणून दिल्या की आमच्यावर राजकारण केल्याचा आरोप होतो. कोरोनावर कुठल्याही प्रकारची चर्चा होऊ नये. सरकारच्या अपयशापासून सगळे लक्ष विचलित व्हावे यासाठी भाजपवर राजकारणाचा आरोप केला जातो. त्यासाठी कधी केंद्राकडे बोट दाखवले जाते, तर कधी अस्मितेचे प्रश्न उभे केले जातात. हा सगळा केविलवाणा प्रकार आहे,’ असे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर या वेळी म्हणाले.

Check Also

पनवेलमध्ये एसआयआरसंदर्भात बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तमतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानासंदर्भात भाजप पनवेल विधानसभा मतदारसंघाचे बीएलए व …

Leave a Reply