Breaking News

तोतया अधिकार्याकडून 95 हजाराची लूट

पनवेल : वार्ताहर

सीआयडी पोलीस असल्याचे सांगून एका भामट्याने मुंबईहून खारघर येथे फर्निचर पहोचविण्यासाठी आलेल्या व्यक्तीजवळची 95 हजाराची रोख रक्कम जबरदस्तीने लुटून पलायन केल्याची घटना घडली. खारघर पोलिसांनी या तोतया सीआयडी पोलिसाविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

या प्रकरणातील तक्रारदार विजयकुमार जैस्वाल (49) हा मुंबईच्या गोरेगाव येथे राहण्यास असून तो त्याच ठिकाणी असलेल्या फर्निचरच्या कंपनीत कामाला आहे. विजयकुमार खारघर सेक्टर-10 मधील शेल्टर एम्पायर इमारतीत फर्निचरचे सामान पोहोचविण्यासाठी आला होता. रात्री 11च्या सुमारास फर्निचरचे सामान ग्राहकाच्या फ्लॅटमध्ये पोहोचविल्यानंतर फर्निचरची 95 हजाराची रोख रक्कम घेऊन विजयकुमार कामगार सलमान याच्यासह रेल्वे स्टेशनच्या दिशेने चालत जात होता. या वेळी मोटारसायकलवरून आलेल्या एका भामट्याने सीआयडी पोलीस असल्याचे भासवून दोघांना अडविले. त्यानंतर त्याने पोलिसांप्रमाणे त्यांच्याकडे विचारपूस करून त्यांची झडती घेतली. या वेळी विजकुमारजवळ 95 हजाराची रोख रक्कम आढळून आल्यानंतर या रकमेबाबत त्याच्याकडे विचारणा करून त्याला दमात घेतले. यावर विजयकुमारने फर्निचरची रक्कम असल्याचे सांगितल्यानंतर तोतया पोलिसाने ज्या इमारतीत फर्निचर उतरविले, ती इमारत दाखविण्याच्या बहाण्याने विजयकुमारला आपल्या मोटारसायकलवर बसवून नेले. दोघेही मोटारसायकलवरून शेल्टर एम्पायर बिल्डिंगजवळ आल्यानंतर तोतया पोलिसांने मोटारसायकल थांबवून विजयकुमारच्या खिशात असलेली रोख 95 हजाराची रक्कम जबरदस्तीने हिसकावून घेतली. त्यानंतर त्याने विजयकुमारला ढकलून देत आपल्या मोटरसायकलवरून पलायन केले. या वेळी विजयकुमारने आरडाओरड करीत त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत  लुटारू अंधाराचा फायदा घेत पळून गेला. त्यानंतर त्याने खारघर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply