माणगाव : प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गावर कोशिंबळे (ता. माणगाव) गावाच्या हद्दीत मंगळवारी (दि. 19) सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास स्विफ्ट कार आणि क्वालीस यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात दोन्ही वाहनांमधील 10 प्रवासी जखमी झाले, तसेच या दोन्ही वाहनांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे.
दरम्यान, गाडीचा चालक प्रसाद घाणेकर (34, रा. बानेटी ता. म्हसळा) हा त्याच्या ताब्यातील स्विफ्ट कार (एमएच-43, एसी-5707) घेऊन मुंबईकडून गोव्याकडे भरधाव वेगात जात होता. त्याने कोशिंबळे गावाच्या हद्दीत आपले वाहन विरुध्द दिशेला आणून समोरून येणार्या क्वालीस गाडीला (एमएच-04, बीवाय-7558) जोरदार धडक दिली. या अपघातात क्वालीसमधील भरत गोपाळ खांडेकर (47), मनोज आत्माराम खांडेकर (3), विजय विठोबा खांडेकर (57), सदाशिव पांडुरंग खांडेकर (65), रमेश पांडुरंग खांडेकर (62), स्वप्नील वसंत खांडेकर (30, सर्व मूळ रा. तिसंगे, ता. खेड, जिल्हा रत्नागिरी, सध्या रा. सांताक्रूझ पूर्व, मुंबई) तसेच स्विफ्ट कारमधील दिनेश सखाराम सत्वे, सुगंधा नीळकंठ घाणेकर, सुमेश रघ्ाुनाथ दत्तन, चालक प्रसाद नीळकंठ घाणेकर असे एकूण 10 जण जखमी झाले आहेत. त्यांना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या भीषण अपघाताप्रकरणी मंगेश काशिराम देवरुखकर (42, रा. मुंबई) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या अपघातास कारणीभ्ाूत ठरलेला स्विफ्ट कारचालक प्रसाद नीळकंठ घाणेकर याच्यावर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस हवालदार एस. बी. मोरे करीत आहेत.