डेक्कन जिमखाना परिसर नो पार्किंग झोन जाहीर करण्याची मागणी
कर्जत ः बातमीदार
कर्जत शहरातील वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. याचे मुख्य कारण अवैध पार्किंग आहे. रेल्वेस्टेशन परिसरातील डेक्कन जिमखाना परिसर दुचाकी पार्किंगचे स्टेशन बनले आहे. अनेक वेळा नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे हा परिसर नो पार्किंग झोन जाहीर करावा, अशी मागणी डेक्कन जिमखानामधील स्थानिक रहिवाशांनी केली आहे. कर्जत नगरपालिका प्रशासनाला याबाबत निवेदनही देण्यात आले आहे.
शहरातील डेक्कन जिमखाना परिसर हा रेल्वेमार्गाला लागून असल्याने रस्तालगत पहाटेपासूनच रहदारी असते. ग्रामीण भागातील कामगार वर्ग सकाळच्या वेळी घाईघाईत येऊन कुठेही दुचाकी पार्किंग करून लोकल पकडण्यासाठी जात असतात. अवैधरित्या पार्किंग केलेल्या वाहनांमुळे येथील हिंगमिरे वाडा तसेच सप्तपदी अपार्टमेंटचा येण्या-जाण्याचा मार्ग बंद होतो. एखादी आपत्कालीन परिस्थितीत त्यांना दवाखान्यात नेण्यास अडचण निर्माण झाल्यास याला जबाबदार कोण? असाही सवाल येथील नागरिक विचारत आहेत.
दररोज निर्माण होणारी समस्या लकसाहत घेऊन डेक्कन जिमखाना रहिवासी मंडळाने हा विभाग नो पार्किंग झोन म्हणून घोषित करावा आणि वाहनांना कायमस्वरूपी पार्किंगकरीता जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी कर्जत नगरपरिषदेला दिलेल्या निवेदनात केली आहे.
अवैध पार्किंगवर कारवाई करा!
जोपर्यंत जागा उपलब्ध होत नाही तोपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात पिंटो गॅस ते मुद्रे रस्त्याच्या पिवळ्या पट्ट्याबाहेर पार्किंगची व्यवस्था करावी. तसेच स्टेशन परिसरातील अधिकृतरित्या पार्किंग करणार्या दुचाकी वाहनांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. डेक्कन जिमखाना रहिवासी मंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन कर्जतचे तहसीलदार आणि पोलीस ठाणे यांनादेखील सादर केले आहे.