गुढीपाडव्यानिमित्त घरखरेदी जोमात
अलिबाग : रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यातील कर्जत, खालापूर, अलिबाग, पेण, रोहा-माणगावपर्यंत ‘सेकंड होम’ खरेदी करणार्यांकडे मुंबई, ठाणे, पुण्यासारख्या मोठ्या शहरातील नागरिकांचा कल वाढू लागला आहे. त्यातच या परिसरात घरांच्या किमती अद्यापही आवाक्यात आहेत. त्यामुळे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्यानिमित्त शनिवारी घरखरेदीला अनेकांनी पसंती दिली. कोरोना कालावधीत बांधलेली हजारो घरे सध्या कमी किमतीत उपलब्ध आहेत, त्याचाही फायदा घेत ही खरेदी झाली.
कोरोना कालावधीत बांधलेल्या घरांना फारशी मागणी नव्हती. यामुळे कर्जत, खालापूर, अलिबाग येथील बांधकाम व्यावसायिकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सवलती दिल्या होत्या. या सवलती गुढीपाडव्यानंतर संपणार आहेत.
राज्य सरकारनेही रेडीरेकनरचे दर वाढविण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून सुरू झाली. त्याचबरोबर मजुरीही दोन महिन्यांपासून 20 टक्के वाढली आहे. युक्रेन-रशिया युद्धामुळे स्टील, सिमेंटच्यकिमतीतही लक्षणीय वाढ होत आहे. यामुळे घरे महाग होण्याआधीच खरेदी करण्यासाठी गुढीपाडवा हा शेवटचा मुहूर्त अनेकांनी साधला. घर किंवा जमीन खरेदीच्या व्यवहारांची बोलणी झाल्यानंतर ठराविक रक्कम देत त्यांनी हा संकल्प सोडला.
अलिबागच्या घरांना सर्वाधिक मागणी
मुंबईपासून समुद्रामार्गे अलिबाग हे निसर्गरम्य असे जवळचे ठिकाण आहे. त्यामुळेच परिसरातील मालमत्तांचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे आता मांडवा, किहीम या परिसरातील शेतजमिनी विकत घेऊन फार्महाऊस बांधण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो. पनवेल, उरण या तालुक्यांनंतर अलिबागमधील जमिनींना पसंती मिळत आहे.
अनेक वर्षे दादर येथे लहानशा खोलीत राहिलो. आता रायगड जिल्ह्यातील कंपन्यांमध्ये रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत. शिवाय येथे दुकाने, लहान-मोठे उद्योग किंवा पर्यटनासंदर्भातील एखादा उद्योग सुरू करणे शक्य आहे. यामुळे आम्ही रोहा तालुक्यात घरखरेदी करणे पसंत केले. -जयदीप सावंत, ग्राहक
गुढीपाडव्याच्या दिवशी निबंधक कार्यालये बंद होती. त्यामुळे ज्यांना व्यवहार करायचा आहे, त्यांनी ठराविक रक्कम दिली. पुढील काही दिवसांत हा व्यवहार पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल. रायगडमध्ये ही पद्धत घर खरेदीसाठी नव्हती, परंतु भविष्यातील बदलत्या परिस्थितीमुळे आजचा मुहूर्त अनेकांनी साधला असावा. -दिलीप जोग, बांधकाम व्यावसायिक