पनवेल : वार्ताहर
नवी मुंबई इन्शुरन्स कंपनीचे कर्मचारी असल्याचे भासवून एका सायबर टोळीने एका व्यावसायिकाला ऑनलाइन विमा काढण्यास प्रवृत्त करून त्यांना आहे. बोनस व इतर सवलती मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल 26 लाख 80 हजार रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. पनवेल शहर पोलिसांनी या टोळीविरोधात फसवणुकीसह आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.
सुरेश दवे (वय 67) असे या व्यावसायिकाचे नाव आहे. लाईफ इन्शुरन्सच्या डायरेक्टर कोट्यातून वन टाईम प्रिमीयम भरून हेल्थ पॉलिसीची ऑफर असल्याचे व घरातील 7 माणसांसाठी 12 लाखांचे कवरेज, मेडिकल खर्च मिळणार असल्याचे तसेच 10 वर्षानंतर वन टाइम प्रीमियमचे पैसे बोनससहित परत मिळतील असे आमिष एका महिलेने त्यांना दाखवले होते. दवे यांनी स्वतःचे व आपल्या दोन मुलांच्या नावाने जॉइंट पॉलिसी घेऊन 99 हजार 999 रुपयांचे दोन चेक या महिलेने पाठविलेल्या व्यक्तीकडे दिले.
यानंतर दवे यांना पॉलिसीच्या वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळ्या अकाऊंटवर तब्बल 26 लाख 80 हजार रुपये पाठवण्यास भाग पाडले. टोळीतील महिलेने दवे यांच्या खात्यात 68 लाख 55 हजार रुपयांची रक्कम 26 मार्च 2021 पर्यंत जमा होईल असे सांगितले, मात्र त्यांच्या खात्यात एक पैसाही जमा झाला नाही. त्यामुळे दवे यांनी कंपनीच्या कस्टमर केअरशी संपर्क साधून माहिती घेतली असता, त्यांची कोणतीही पॉलिसी काढण्यात आली नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे दवे यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली.