Breaking News

उरण पीरवाडी बीच पुन्हा बहरतोय!

उरण : प्रतिनिधी

मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथील असंख्य तरुणाईचे मौजमजा करण्याचा पिकनिक स्पॉट म्हणजे उरण येथील पीरवाडी बीच. सरंक्षक बंधार्‍यांच्या उभारणीनंतर या बीचला नवा साज मिळाला आहे. यामुळे बीचवर कोरोनानंतर सणासुदीच्या आणि सुटीच्या दिवसांत पर्यटनही आता बर्‍यापैकी बहरत चालले आहे.

उरणच्या पीरवाडी समुद्रकिनारा हा पर्यटकांना नेहमीच आकर्षित करीत आला आहे. किनार्‍यावर अथांग पसरलेली रुपेरी वाळू आणि या रुपेरी वाळूत पायी चालण्याची मजा काही औरच असते. निसर्गरम्य वातावरण, चौफेर अथांग पसरलेला समुद्र, समुद्र किनार्‍यावरील लांबचलांब नजरेत पडणारी नारळी, पोफळी आणि सुरुची झाडे या नयनरम्य वातावरणामुळे पीरवाडी पर्यटन बीच म्हणून नावारूपाला आले आहे.

पीरवाडी बीचवर येणार्‍या पर्यटकांची संख्या वाढत आहे. यामध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पनवेल आणि इतर भागातुन येणार्‍या पर्यटकांची संख्या अधिक असते. येथील समुद्र किनार्‍यावर असलेल्या दर्ग्यावर मुस्लिम समाजातील नव्हे तर हिंदू धर्मातील भाविकांची नेहमीच गर्दी असते.

मध्यंतरीच्या काळात उरण-पीरवाडी किनार्याची मोठ्या प्रमाणात धुप होत चालली होती. त्यामुळे समुद्राच्या भरतीच्या अजस्त्र लाटांनी सरंक्षक बांधबंदिस्ती उद्ध्वस्त करून समद्राचे पाणी सागरी सीमा ओलांडून समुद्र रेषेपासुन दहा ते पंधरा मीटर अंतरापर्यंत शिरायचे. धुप प्रतिबंधक नसल्याने या किनार्याची प्रचंड धूप होऊन प्रचंड प्रमाणात नासधूस झाली होती. समुद्र किनार्‍यावरील लांबचलांब नजरेत पडणारी नारळी, पोफळी आणि सुरुची झाडे उन्मळून पडली होती. झाडांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली होती. किनार्‍यावर असलेल्या स्मशानभूमीदेखील लाटांच्या तडाख्याने पार उद्ध्वस्त झाली होती. याकडे दुर्लक्ष झाल्याने उरणमधील पर्यटन म्हणून ओळखले जाणारे पीरवाडी बीच नष्ट होण्याच्या मार्गाला लागले होते. आता ओएनजीसी आणि बंदर विभागाच्या माध्यमातून पीरवाडी बीचची धुप थांबविण्यासाठी मजबूत अशी संरक्षक तटबंदी उभारली जात आहे. भलेमोठे दगड तटबंदीसाठी वापरण्यात येत आहेत. यामुळे किनार्‍याची मोठ्या प्रमाणावर होणारी धुप थांबण्यास मदत झाली आहे. किनार्‍यावरील नारळी पोफळीच्या आणि इतर झाडांनाही तटबंदीमुळे आपोआप सरंक्षण मिळाले आहे. त्यामुळे पीरवाडी बीच परिसरात निसर्गरम्य वातावरण निर्माण होण्यास मदत झाली आहे.

पर्यटकांसाठी मोटर स्पीडबोट उपलब्ध

मागील काही वर्षांत किनार्‍याची गेलेली रया आणि मागील दोन वर्षांच्या कोरोना काळात पीरवाडी बीचवरील पर्यटकांची संख्या रोडावली होती. आता सरंक्षक तटबंदी नयनरम्य वातावरणामुळे बीचवर पर्यटनही बहरू लागले आहे. समुद्राचा आनंद लुटण्यासाठी मोटर स्पीडबोटीची व्यवस्था आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई व परिसरातील शेकडो हौशी पर्यटक या ठिकाणी सणासुदीच्या आणि सुटीच्या काळात येत आहेत. पर्यटनाचा आनंद घेत आहेत.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply