Breaking News

माथेरानमध्ये मालगाडी सुरू करा; स्थानिकांची मागणी

कर्जत : बातमीदार

माथेरान हे जगविख्यात पर्यटनस्थळ असून, येथील पर्यटन अबाधित राहण्यासाठी व येथील निसर्गचा र्‍हास होऊ नये म्हणून येथे मोटार वाहनांना बंदी आहे. त्यामुळे येथील स्थानिकांना मालवाहतूक मनुष्यबळावर करावी लागते. पण कालानुरूप मालवाहतुकीकरीता माणसे मिळणे कठीण झाले आहे. यासाठी येथील स्थानिकांनी मालवाहतूक करणारी मालगाडी पुन्हा सुरू करावी, अशी मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.

माथेरानला येण्यासाठी नेरळ-माथेरान हा एकमेव रस्ता असून तो शहरापासून दोन किलोमीटर लांब आहे. येथून मालवाहतूक करणे स्थानिकांना त्रासदायक ठरू लागले आहे. यापूर्वी मालवाहतूक करण्यासाठी माणसे उपलब्ध होत असत, मात्र काळानुरूप ती ही मिळणे कठीण झाल्याने स्थानिकांचा त्रास वाढला आहे. परिणामी येथील किराणामाल नाईलाजास्तव जास्त दराने विकत घेण्याची  नामुष्की स्थानिकांवर आली आहे.

1980 च्या दशकात माथेरानमध्ये मध्य रेल्वेकडून मालवाहतूक करणारी मालगाडी धावत होती. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू येथील दुकानांपर्यंत पोहोचत होत्या आणि स्थानिकांना किरणामाल रास्त भावात मिळत होता. मात्र रेल्वे प्रशासनाने मालगाडी बंद केली, त्यामुळे येथील स्थानिक दुकानदार हवालदिल झाले आहेत.

दोन वर्षापूर्वी माथेरानची मिनिट्रेन बंद पडणार की काय? अशी भीती निर्माण झाली होती. पण स्थानिक व लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे मिनीट्रेन रुळावर आली. मात्र मालगाडी सुरू झाली नाही. यामुळे येथील व्यापारी. सर्व पक्षातील नेते व स्थानिकांनी मालगाडी सुरू करावी, अशा आशयाचे निवेदन नुकतेच माथेरानला   आलेले मध्य रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक डी. के. शर्मा यांच्याकडे दिले आहे.

माथेरानमध्ये याअगोदर मध्य रेल्वेची मालगाडी सुरू होती. मात्र रेल्वे प्रशासनाने कोणतेही कारण न देता ही मालगाडी बंद केली. तीच मालगाडी रेल्वे प्रशासनाने पुन्हा सुरू केल्यास माथेरानमधील व्यापारी व जनतेला मोठा आधार मिळेल.

-प्रसाद सावंत, गटनेता, माथेरान गिरीस्थान नगर परिषद

पूर्वी येथील मालगाडीतून व्यापार्‍यांचा माल कमी पैशात, वेळेवर व सुरक्षित येत होता. आता मात्र हाच माल आणताना व्यापार्‍यांना तारेवरची कसरत करावी लागते. मनुष्यबळ नसल्याने हा किराणा माल दोन किलोमीटर लांब असलेल्या माथेरानच्या प्रवेशद्वारात दोनदोन दिवस ठेवावा लागतो. त्यामुळे आम्हाला आर्थिक नुकसान सोसावे लागते.

-राजेश चौधरी, अध्यक्ष, व्यापारी मंडळ, माथेरान

Check Also

‘शराबी’ 40 वर्ष; अमिताभचा वन मॅन शो

मुछे हो तो नत्थूलाल जैसी हो वरना नहीं हो, कलाकार सिर्फ तारीफ का भूखा होता …

Leave a Reply