कर्जत : बातमीदार : एसटीच्या कर्जत आगारातील आठ कामगारांच्या अन्यत्र बदल्या झाल्या होत्या, मात्र कार्यमुक्त करण्यात येत नसल्याने या आठ कामगारांनी आमरण उपोषण सुरू केले होते. मात्र दुसर्या दिवशी गुरुवारी (दि. 2) रात्री साडेदहा वाजता हे उपोषण स्थगित करण्यात आले. सोमवारपासून या आठ पैकी दर चार दिवसांनी दोन दोन कामगारांना कार्यमुक्त केले जाणार आहे. कर्जत एसटी आगारातील कर्मचारी हुसेन नारायण गेडाम, राजेश दौलतराव आपोतीकर, गणेश विठ्ठलराव चांदेकर, उमेश विठ्ठल चांदेकर, विनोद बाबुरावजी उईके, विनोद आत्मराम कनाके, विनोद देवराम आत्राम आणि बाजीराव रामराव शिंदे यांची जिल्हा बदली करण्यात आली आहे. कर्जत आगारात अनेक वर्षे सेवा केल्यानंतर त्यांची सेवा ज्येष्ठतेनुसार अन्य जिल्ह्यात बदली झाली आहे. मात्र रायगडच्या वाहतूक विभाग नियंत्रक कार्यालयाने आंतर विभागीय बदली झालेल्या कर्मचार्यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले नव्हते. आपल्याला कर्जत आगारातून कार्यमुक्त करावे, यासाठी हे आठ कर्मचार्यांनी बुधवारपासून आमरण उपोषण सुरु केले होते. दुसर्या दिवशी आठ पैकी आत्राम, कनाके, चांदेकर, उईके, गेडाम यांची प्रकृती खालावल्याने त्यांना कर्जत उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. हे लक्षात घेऊन नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी उपोषणकर्ते आणि एसटी महामंडळ यांच्यात मध्यस्थी केली.
नगराध्यक्ष जोशी यांनी राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यासोबत चर्चा करून कर्जत एसटी आगाराला जादा कामगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मिळविल्यानंतर कर्जत एसटी आगाराने अन्य जिल्ह्यात बदली झालेल्या त्या आठ कामगारांना कार्यमुक्त करण्याचे आदेश देण्याची सूचना परिवहन मंत्र्यांनी केली. त्यानुसार सोमवार (दि. 6)पासून दर चार दिवसांनी बदली झालेल्या 2-2 कामगारांना त्यांच्या बदलीच्या ठिकाणी सोडले जाईल. हा तोडगा उपोषणकर्त्यांना मान्य झाल्याने त्यांनी गुरुवारी रात्री साडेदहा वाजता उपोषण सोडले. त्यावेळी नगराध्यक्ष जोशी यांच्यासह नगरसेवक विवेक दांडेकर, विशाखा जिनगरे, स्वामिनी मांजरे, माजी नगरसेवक संतोष पाटील, अरविंद मोरे, निलेश घरत, निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड, आगार प्रमुख यादव यांच्यासह एसटीचे अधिकारी, कर्मचारी आणि कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.