Breaking News

शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धेत राज्यातील ड वर्ग महापालिकांमध्ये पनवेल अव्वल

पनवेल : वार्ताहर
महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा 2022मध्ये पनवेल महानगरपालिकेने ड वर्ग महानगरपालिकांच्या गटामध्ये राज्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. 20 एप्रिल या नगर विकास दिनाचे औचित्य साधून एनसीपीए येथे झालेल्या भव्य समारंभामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव सोनिया सेठी, आयुक्त तथा संचालक किरण कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत पनवेल महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांचा 15 कोटी रुपयांचा धनादेश व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
पनवेल महापालिकाच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ, उपायुक्त सचिन पवार, सहाय्यक आयुक्त डॉ. वैभव विधाते यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
महाराष्ट्र राज्याच्या नगर विकास विभागाने राज्यातील सर्व महानगरपालिका व नगरपालिका यांकरिता शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा 2022 आयोजित केली होती. यामध्ये विविध घटकांनुसार गुणांकन पद्धतीने वर्गनिहाय प्रत्येक प्रशासकीय विभागातील निवडलेल्या सर्वोत्कृष्ट महानगरपालिका व नगरपालिका यांची राज्यस्तरीय तपासणी समितीने पाहणी करून ही निवड केली आहे. या स्पर्धेसाठी मध्यवर्ती चौक, ऐतिहासिक वारसा स्थळे व स्मारक, जलाशयांचे संवर्धन, बाजारपेठा यांचे सौंदर्यीकरण तसेच सुंदर हरित पट्ट्यांची निर्मिती, विविध भागातील स्वच्छता अशा घटकांचा समावेश होता. याकरिता महानगरपालिकेने राबवलेले विविध उपक्रम निर्णायक ठरले.
पनवेल महानगरपालिकेने केवळ भिंती रंगवणे या कामावर भर न देता याबरोबरच शाश्वत सौंदर्यीकरण केले या बाबीचा निवड समितीवर प्रभाव पडला यावर या पुरस्कारामुळे शिक्कामोर्तब झाले. जलाशयांबाबत दीर्घकालीन उपाययोजना करताना वडाळे तलावामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे संवर्धन व सुशोभीकरण केले. सुनियोजित शहर अशी ओळख असलेल्या पनवेल महानगरपालिकेच्या या राज्यस्तरीय यशाने आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
सध्या सुरू असलेल्या विकासकामांमुळे पनवेल महानगरपालिका राष्ट्रीय पातळीवर स्वतःची वेगळी ओळख निश्चितच निर्माण करेल यात शंका नाही. शहराच्या विकासामध्ये सहभाग घेतलेले सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी, शहरातील सर्व नागरिक यांच्या सहभागामुळे व सकारात्मक प्रतिसादामुळेच प्रशासनाला हे यश प्राप्त करता आले, अशी प्रतिक्रिया महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख यांनी व्यक्त केली.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply