कर्जत : बातमीदार : कम्युनिटी ऍक्शन फॉर न्यूट्रिशन अंतर्गत कर्जत तालुक्यातील टेंबरे ग्रामपंचायत हद्दीमधील अंगणवाडी बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यात तेथील तीन आदिवासी वाड्यात 8 बालके कुपोषित आढळली आहेत. त्यामुळे महिला बालकल्याण विभागाचा कर्जत तालुक्यात कुपोषण नाही, हा दावा फोल ठरला आहे. दिशा केंद्राच्या माध्यमातून कर्जत तालुक्यात राष्ट्रीय आरोग्य केंद्राचा कम्युनिटी ऍक्शन फॉर न्यूट्रिशन हा प्रकल्प राबविला जात आहे. त्या माध्यमातून दिशा केंद्राने एनआरसी पथकात असलेल्या वैद्यकीय अधिकार्यांच्या मदतीने अंगणवाडीमधील बालकांची आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार टेंबरे ग्रामपंचायत हद्दीतील टेंबरे कातकरीवाडी, रजपे कातकरीवाडी आणि पाचखडकवाडी कातकरीवाडीमधील अंगणवाडी बालकांची आरोग्य तपासणी केली. राष्ट्रीय आरोग्य केंद्राच्या पथकात असलेल्या डॉ. जयश्री म्हात्रे, पूजा महाले, गणेश घुले आणि भरारी पथकाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर काटे यांनी 60 बालकांची आरोग्य तपासणी केली. त्यात कमी उंचीची आणि कमी वजन असलेली अशी अतितीव्र कुपोषित 8 बालके आढळली. त्या सर्व कुपोषित बालकांवर अलिबाग येथील एनआरसी केंद्रात उपचार केले जाणार असून त्यांचे कुपोषण निर्मूलन केले गेल्यानंतर त्यांना घरी सोडले जाईल, अशी माहिती दिशा केंद्राचे अशोक जंगले यांनी दिली आहे. या आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन आदिवासी विकास विभागाच्या पेण प्रकल्पाचे निरीक्षक भानुशाली यांच्या हस्ते झाले, त्यावेळी टेंबरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच हरेश घुडे, प्रमोद पिंगळे, महात्मा गांधी तंटा मुक्त गाव समितीचे अध्यक्ष सुरेश सोनावणे उपस्थित होते. हे शिबिर यशस्वी व्हावे, यासाठी दिशा केंद्राचे कार्यकर्ते रवी भोई, विमल देशमुख, रेणुका म्हसे, आदींसह अन्य कार्यकर्त्यांनी वाडी -वस्तीत जाऊन अंगणवाडीमधील बालकांना आणले होते.
Check Also
खानावमध्ये शेकाप कार्यकर्ते भाजपात
आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले स्वागत पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाला पुन्हा …
RamPrahar – The Panvel Daily Paper