सलग सुट्ट्यांमुळे लोंढा वाढला; प्रवासी, पर्यटक त्रस्त
पाली : प्रतिनिधी
पाली-खोपोली राज्यमहामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसागणिक अत्यंत गंभीर होताना दिसत आहे. सलग सुट्ट्यामुळे अनेकांनी फिरायला जाण्याचा बेत केला. मुंबई व पुण्यावरून आलेल्या असंख्य पर्यटकांमुळे शुक्रवारी (दि. 15) पाली फाटा ते एडलेब इमॅजिका या जवळपास तीन किमी अंतरापर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे कित्येक तास वाहतूक कोंडी होऊन प्रवासी व पर्यटकांचे खूप हाल झाले.
शुक्रवार, शनिवार आणि रविवार या सलग सुट्ट्यांमुळे खोपोली-पाली मार्गावरील एडलेब इमॅजिका थीम व वॉटर पार्क येथे धम्माल मस्ती करण्याचा प्लॅन अनेकांनी आखले. शिवाय महाबळेश्वर तसेच अष्टविनायक दर्शन व श्रीवर्धन बीच, हरिहरेश्वर याठिकाणी जाण्यास पर्यटक मोठ्या संख्येने निघाले. पर्यटकांच्या गाड्यांमुळे शुक्रवारी पाली-खोपोली राज्यमहामार्गावर कित्येक तास वाहतूक कोंडी होऊन प्रवासी व पर्यटकांचे हाल झाले. रणरणत्या उन्हात त्रासलेले प्रवाशी वाहतूक कोंडीत अधिकच बेजार होताना दिसले. शिवाय जागोजागी सुरू असलेले धीम्या गतीचे रस्त्याचे काम याचीदेखील मोठी डोकेदुखी असल्याचे प्रवाशी रमेश पवार यांनी सांगितले.
खोपोली-पाली-वाकण या राज्यमहामार्गाच्या रुंदीकरणाचे काम संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणे अतिशय बिकट झाले आहे. त्यातच पुण्यामुंबईवरून कोकणात येणारे पर्यटक येथून जातात. तसेच मुंबई-पुणे द्रुतगतीमार्ग येथूनच गेला आहे. त्यामुळे या राज्यमहामार्गावर नेहमी वाहतुकीचा ताण असतो. तसेच येथील एडलेब इमॅजिका थीम व वाटर पार्क येथे सध्या असंख्य पर्यटक येत आहेत. त्यामुळेच येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
अनेक वाहनचालक नियमांचे पालन न करता वाहने ओव्हरटेक करून पुढे नेतात तसेच दोन-दोन रांगा लावतात आणि त्यामुळे समोरील वाहनास जाण्यास अडथळा येतो. एडलेब इमॅजिका येथे पार्किंगची व्यवस्था असतांनादेखील पैसे वाचविण्यासाठी काही वाहनचालक खोपोली-पाली रत्याच्याकडेला आपल्या गाड्या लावतात. रस्त्याच्याकडेला उभ्या केलेल्या वाहनांमुळेदेखील वाहतूक कोंडी होते. येथे वाहतूक पोलिसांनी नियमित तैनात राहिले पाहिजे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. येथील वाहतूक कोंडीमुळे छोटे अंतर पार करतांनादेखील वाहनचालक व प्रवाशांना खूप वेळ खोळंबावे लागते.