पेण : प्रतिनिधी
नदीविषय आपली नदी ही संकल्पना मनात रुजली पाहिजे. जोपर्यंत सर्वांची नदी ही संकल्पना आहे, तोपर्यंत नदीचे प्रदूषण होतच राहील. नदीचे प्रदूषण टाळायचे असेल तर एक दिवसाचे काम करून भागणार नाही, तर सतत वर्षानुवर्षे काम करावे लागेल, असे प्रतिपादन जल जैविक शेती संरक्षक डॉ. आदित्य धोपटकर यांनी पेण येथे केले.
समाज प्रबोधन मंचाच्या वतीने पेण येथे भोगावती नदी संवर्धन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात डॉ. चोपटकर मार्गदर्शन करीत होते. युरीयाच्या अतिवापरामुळे जलपर्णी वाढतेे, असा दावा करून डॉ. चोपटकर यांनी या वेळी जैविक खतांचा वापर करण्याचा सल्ला दिला.
निर्मात्यांमध्ये फुल, दोर्याबरोबर प्लॅस्टिक, चकचकी, थर्माकोल आदींचा समावेश असतो व निर्माल्य कुजण्याऐवजी सडू लागते आणि दुर्गंधीला सुरुवात होते, असे डॉ. आदित्य धोपटकर यांनी या वेळी सांगितले.
नदीपात्रात निर्माल्य व इतर कचरा टाकणार्या नागरिकांचे जोपर्यंत प्रबोधन होत नाही, तोपर्यंत नदी संवर्धन उपक्रमांना अपेक्षित यश मिळणार नाही, असे मत पर्यावरण अभ्यासक प्रा. उदय मानकवळे यांनी या वेळी व्यक्त केले.
सकाळी महायज्ञ करून भोगावती महोत्सवाला सुरुवात झाली. ज्येष्ठ समाज सुधारक अशोक भोईर, निसर्गप्रेमी सतिश पोरे, संगणक तज्ज्ञ अतुल वैद्य, दिगंबर राऊत, दीपश्री पोटफोडे, माजी नगरसेवक संतोष पाटील, कुस्तीपट्टू सुधाकर पोटे, भूषण कडू, जयेश पाटील, सागर दाबके, तुळशिराम सावंत, मनिष देशमुख यांच्यासह नागरिक या महोत्सवाला उपस्थित होते. संध्याकाळी भोगावती माईची महाआरती करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
हा भोगावती नदी संवर्धन महोत्सव यशस्वी करण्यासाठी प्रा. उदय मानकवळे, रुपेश कदम, ए. बी. पाटील, रवींद्र पाटील आदिंसह समाज प्रबोधन मंचच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.