महाड : प्रतिनिधी
महाड आणि परिसरात गेली कांही महिन्यापासून बेकायदेशीर वाळू उत्खनन सुरूच असून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत वाळू चोरी केली जात आहे. विशेष म्हणजे वाळू उत्खनन महाड शहराच्या लगतच होत असल्याने प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष यामुळे उघड होत आहे. यातून शासनाचा महसूल नक्की कोण बुडवतोय असा प्रश्न निर्माण होत आहे.
कोकण विभागात महसूल वसुलीत रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला असून महाड विभागाने कोरोना काळात विक्रमी वसुली केली आहे. मात्र रेती चोरांनी नदीपात्रात उत्खनन करून कितीतरी पटीने अधिक महसूल बुडविला आहे. महाड तालुक्यात रायगड खोर्यातील गांधारी नदीपात्रात पिकअप वाहनाद्वारे उघडपणे रेती वाहतूक केली जाते. महाड-रायगड मार्गावर विविध ठिकाणी वाळूचे उत्खनन केले जात आहे. आदिवासींच्या माध्यमातून वाळू काढून स्थानिक तरुण पिकअपमधून पुरवठा करतात. वाळण खोर्यात व काळ नदीपात्रात ट्रॅक्टर व डम्परद्वारे रेती वाहतूक केली जाते तर सावित्री नदीपात्रात पोलादपूर तालुक्यापासून महाडपर्यंतच्या वीस किलोमीटरच्या पट्ट्यात जेवढा प्रशासनाने सावित्री पात्रातून गाळ काढून प्रशासनाला लाखो रुपयांचा चुना लावला आहे. सावित्री नदीपात्रात शेडाव नाक्यानाजिक, वडवली, कोल, दादली पूल, नडगाव याठिकाणी वाळू उत्खनन सुरु आहे. त्याचप्रमाणे नागेश्वरी नदीवर पांगारी, कावळे, रेवतळे याठिकाणीदेखील वाळू उत्खनन केले जात आहे.
शासनाकडून महाड तालुक्यातील सावित्री पात्रात वाळण खुर्द, वाळण बुद्रुक, वरंध, शिवतरघळ, शेडाव नाका आदी ठिकाणी नदीपात्रातून 15 पोकलेन, 50 टिप्पर एक डोजर व सहा जेसीपी यंत्राद्वारे नदीपात्रातून गाळ काढला जात आहे. रात्रीच्या वेळेस व पहाटे रेती चोरांनी धुमाकूळ माजविला असून त्यामुळे शासनाला लाखो रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागत आहे. ज्या ठिकाणी नदीपात्रात गाळ काढला जात आहे त्याठिकाणीच वाळूचे उत्खनन केले जात असल्याने सर्वसामान्य माणसाला मात्र गाळ उत्खनन सुरु असल्याचे दिसून येते.