पुणे ः प्रतिनिधी
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजप आमदारांनी आवाज उठविला होता. पहिल्या दिवशी सभागृह तहकूब केल्यानंतर सभागृह अध्यक्षांच्या केबिनमध्ये येऊन काही आमदारांनी शिवीगाळ केल्याचा आरोप आमदार भास्कर जाधव यांनी केला होता. या संदर्भात पुण्यात पत्रकारांशी बोलताना विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आमच्याविरोधात कुभांड रचण्यात आले आहे, असा आरोप ठाकरे सरकारवर केला. पुणे शहरातील महापालिकेच्या एसी बसच्या योजनेचे उद्घाटन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्या वेळी माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली. फडणवीस म्हणाले, मी अतिशय विनम्रपणे सांगतो की, भाजपच्या एकाही नेत्याने शिवीगाळ केलेली नाही. बाचाबाची झाली. शिवसेनेचे लोक त्या ठिकाणी होते जे आमच्या लोकांच्या अंगावर आले. शिवीगाळ करणारे कोण होते याची माहिती घ्या. मी योग्य वेळी ते सांगेनच. भाजपच्या एकाही कार्यकर्त्याने पिठासीन अध्यक्षांना धक्काबुक्की किंवा शिवीगाळ केलेली नाही. आमच्याविरोधात कुभांड रचण्यात आले आहे. 12 आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन करण्यात आल्यानंतर भाजपने सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केला होता. खोटी स्टोरी रचून भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे, असे फडणवीस म्हणाले होते. त्यानंतर अधिवेशनाच्या दुसर्या दिवशी भाजपने विधिमंडळाच्या परिसरामध्ये प्रतिविधानसभा भरवली, मात्र या प्रतिविधानसभेविरोधात महाविकास आघाडीतील आमदारांनी कारवाईची मागणी केल्यानंतर विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या आदेशानंतर माईक जप्त करण्यात आले. त्यानंतरही भाजप आमदारांनी पत्रकार कक्षामध्ये आपले आंदोलन सुरुच ठेवले होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper