Breaking News

विकासकामांच्या आधारावर जनतेचे आशीर्वाद मागणार -नितीन गडकरी

नागपूर ः प्रतिनिधी : मी राजकारणात दुश्मनी ठेवली नाही. सर्वांशी माझे चांगले संबंध आहेत. नाना पटोलेंनी पक्ष सोडला असला तरी त्यांच्यावर आशीर्वाद कायम राहतील, तसेच निवडणुकीसाठी पटोलेंना शुभेच्छा आहेत, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे. नागपुरात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर नितीन गडकरी म्हणाले की, राजकारणात प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, मग कोणीही उमेदवार असेल. मी कोणावरही वैयक्तिक टीका-टिप्पणी करणार नाही. काँग्रेस पक्षाला आपला उमेदवार ठरवण्याचा अधिकार आहे. जो उमेदवार असेल त्याने लढावं. मी जे पाच वर्षात काम केलं, त्याच्याच आधारावर लोकांसमोर जाऊन त्यांचा आशीर्वाद मागेन, असे त्यांनी सांगितले.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने महाराष्ट्रातील पाच उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहेत. नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून नाना पटोले यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे साहजिकच आगामी निवडणुकीत गडकरी विरुद्ध पटोले असा सामना पाहायला मिळणार आहे.

नागपूर लोकसभा मतदारसंघातून नितीन गडकरी सध्या खासदार आहेत. या मतदारसंघात प्रामुख्याने दलित मतदारांची संख्या जास्त असल्याने दलितांची मते निर्णायक असतील. त्याचसोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय या मतदारसंघात येत असल्याने हा मतदारसंघ भाजपसाठी महत्त्वाचा मानला जातो. गेल्या निवडणुकीत नितीन गडकरी यांना 5 लाख 87 हजार मते मिळाली होती. काँग्रेसचे नेते विलास मुत्तेमवार यांचा पराभव या निवडणुकीत झाला होता. विलास मुत्तेमवार यांना 3 लाख 3 हजारे मते मिळाली होती.

मागील लोकसभा निवडणुकीत नाना पटोले यांनी भाजपकडून निवडणूक लढवली होती. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून पटोले विजयी झाले होते, मात्र 2017मध्ये नाना पटोले यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पटोले यांच्या राजीनाम्यानंतर भंडारा-गोंदिया येथे झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे यांनी विजय मिळवला होता.

Check Also

शेकापच्या धामणी आणि धोदानी गावातील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांची रविवारी (दि.20)उमेदवारी …

Leave a Reply