पनवेल ः वार्ताहर
अस्तित्वात नसलेल्या महाविद्यालयीन खर्चात तसेच प्राध्यापकांच्या वेतनात वाढ दाखवून शुल्क नियामक प्राधिकरणाची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी पनवेलमधील सेंट विल्फ्रेड विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश साखरे यांच्यावर फसवणुकीसह बनावटगिरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पनवेलमधील सेंट विल्फ्रेड विधी महाविद्यालयाने अस्तित्वात नसलेल्या महाविद्यालयीन खर्चात तसेच प्राध्यापकांच्या वेतनात वाढ दाखवून शुल्क नियामक प्राधिकरणाकडून विधी महाविद्यालयाच्या फी वाढ प्रस्तावांना मंजुरी मिळविली. त्यातून विद्यार्थ्यांसह शिक्षक-प्राध्यापक त्याचप्रमाणे शुल्क नियामक प्राधिकरणाची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक सागर कांबळे यांनी हा भ्रष्टाचार माहिती अधिकारात उघडकीस आणल्यानंतर पनवेल तालुका प्राचार्य डॉ. राजेश साखरे यांच्यावर फसवणुकीसह बनावटगिरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सेंट विल्फ्रेड विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश साखरे यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करून एका विद्यार्थ्याला परीक्षेला न बसताच पास केले होते. ही बाब सहाय्यक प्राध्यापक सागर कांबळे यांनी उघडकीस आणली होती. तसेच या प्रकरणात पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पनवेल तालुका पोलिसांनी प्राचार्य डॉ. राजेश साखरे आणि प्रा. मालती गाढे यांच्याविरोधात सप्टेंबर 2020मध्ये गुन्हा दाखल केला आहे. हा गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर सागर कांबळे यांनी डॉ. राजेश साखरे यांनी केलेल्या गैरव्यवहाराची माहिती मिळविण्यासाठी मुंबई विद्यापीठ तसेच शुल्क नियामक प्राधिकरण कार्यालयाकडे माहिती अधिकारात अर्ज केले होते. त्यानुसार अनेक धक्कादायक गोष्टी उघड झाल्या. प्राधिकरणाकडून मिळालेल्या माहितीत प्राचार्य डॉ. राजेश साखरे यांनी विद्यार्थ्यांकडून जास्त पैशांची लूट करण्यासाठी अस्तित्वात नसलेल्या महाविद्यालयीन खर्चात वाढ दाखविल्याचे आढळले.
तसेच त्यांनी शुल्क नियामक प्राधिकरणाकडे बनावट दस्तऐवजांच्या आधारे प्रतिज्ञापत्रावर खोटी माहिती देऊन मागील तीन-चार वर्षांपासून प्राधिकरणाकडून फी वाढ प्रस्तावांना मंजुरी मिळविल्याचे आढळले. विधी महाविद्यालयाकडून शुल्क नियामक प्राधिकरणाकडे सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांत प्राध्यापकांचे बनावट हस्ताक्षर तसेच बँक ऑफ महाराष्ट्राच्या बनावट पगार खात्यामार्फत 35 ते 40 प्राध्यापकांना महिन्याला 90 हजारांपेक्षा अधिक पगार देण्यात येत असल्याचे दाखवून प्राध्यापकांचीही फसवणूक केल्याचे आढळले. प्राचार्य डॉ. साखरे यांनी संस्थाचालकांच्या संगनमताने कोट्यवधींचा अपहार केल्याचे उघडकीस आल्यानंतर सागर कांबळे यांनी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी पनवेलमधील सेंट विल्फ्रेड विधी महाविद्यालयाचे प्राचार्य साखरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.
विवाहितेशी अंगलट करणार्याविरोधात गुन्हा
पनवेल ः एका विवाहितेशी अश्लील वर्तन तसेच तिची इच्छा नसतानाही प्रेमसंबंधासाठी आग्रह व तिच्या पतीला मारण्याची धमकी देणार्या इसमाविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील पळस्पे फाटा रिलायन्स पेट्रोल पंप परिसरात राहणारी विवाहिता मुलासह घरात असताना आरोपी तिच्या घरी आला. यानंतर त्याने तिची इच्छा नसतानाही प्रेमसंबंध ठेवण्यासाठी आग्रह करून तिच्या पतीला मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.