टँकरने पुरवठा करण्यास निविदाधारकाचा नकार
पोलादपूर : प्रतिनिधी
पाणीटंचाई निवारण आराखड्यातील पोलादपूर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांची टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची मागणी 1 एप्रिल 2022 पासून सुरू झाली आहे. मात्र प्रतिकिलोमीटर भाडे परवडत नसल्याने परजिल्ह्यातील टँकर निविदाधारकाने पोलादपूर तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे तालुक्यातील पाणीटंचाईने उग्र स्वरूप धारण केले आहे. पोलादपूर तालुक्याच्या टंचाई निवारण आराखड्यामध्ये सुमारे एक कोटी 79 लाख 95 हजार रूपये खर्चाच्या एकूण 328 उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. त्यात 28 गावे आणि 61 वाड्यांतील विहिरींतील गाळ उपसा करून खोल करण्याचे 61 लाख 20 हजार रुपयांचे 89 प्रस्ताव आहेत. 45 गावे 106 वाड्यांसाठी 30 लाख 20 हजारांचे टँकर अथवा बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा करण्याचे प्रस्ताव आहेत. तसेच सात गावे आणि दोन वाड्यांतील नऊ नळ पाणीपुरवठा योजनांची विशेष दुरूस्ती करण्याकामी 45 लाखांचे प्रस्ताव करण्यात आले आहेत. विंधन विहिरींच्या दुरूस्तीचे दोन गावे नऊ वाड्यांमध्ये दोन लाख 75 हजार रुपये खर्चाच्या11 उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. 13 गावे आणि 55 वाड्यांमध्ये 68 विंधन विहिरी घेण्यासाठी 40 लाख 80 हजारांचा प्रस्ताव करण्यात आला आहे. यापैकी काही टंचाईनिवारणाची कामे आधीच सुरू झाली आहेत. निविदाधारक विजय विलास शिंदे (रा.नाणार गल्ली, कवठेमहांकाळ, जि. सांगली) यांनी पोलादपूर तालुक्यातील 45 गावे 106 वाड्यांसाठी टँकर अथवा बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा करण्याचे काम स्वीकारले आहे. मात्र पोलादपूर तालुक्यातील रस्ते आणि भौगोलिक परिस्थिती पाहता प्रति किमी भाडे कमी मिळत असल्याचे कारण दाखवून त्याने पाणीपुरवठा करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे तालुक्यातील पाणीटंचाईच्या झाळा अधिक तीव्र झाल्या आहेत. रायगड जिल्हाधिकार्यांनी आदेश देऊन टँकरद्वारे पाणीपुरवठा करणारा नवीन निविदाधारक तातडीने अधिग्रहीत केला करावा, अशी मागणी होऊ लाग ली आहे.