Breaking News

उमटे धरणातील गाळ काढण्यास खूप विलंब; लवकरात लवकर कार्यवाही करा -आमदार प्रशांत ठाकूर

निविदा मंजुरीबाबत अंतिम कार्यवाही सुरू : मंत्री गुलाबराव पाटील

पनवेल : रामप्रहर वृत्त
अलिबाग तालुक्यातील उमटे धरणातील गाळ काढण्यास खूप विलंब झाला आहे. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या समस्यांना कायम सामोरे जाऊ लागू नये यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल केला होता. त्या अनुषंगाने चौथ्यांदा निविदा प्रसिद्ध करून निविदा मंजुरीबाबत अंतिम कार्यवाही सुरू असल्याचे लेखी उत्तर राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.
उमटे धरणातील गाळ काढण्यासाठी आठ कोटी 81 लाख 35 हजार 631 इतक्या रकमेची ई-निविदा प्रसिद्ध होऊन बराच कालावधी होऊनसुद्धा अद्यापही धरणातील गाळ काढण्यासाठी विलंब होत असल्याचे मे 2025मध्ये निदर्शनास आले. आहे. या धरणाचा गाळ काढल्यास जवळपास 46 गावे व 33 आदिवासीवाड्यांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार असून संबंधित विभागातील अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे धरणातील गाळ काढण्यासाठी तीन वेळा निविदा व सूचना प्रसिद्ध करूनही धरणाचा गाळ काढण्यास विलंब होत असल्यामुळे गावांना व आदिवासीवाड्यांना पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे या प्रकरणी शासनाने चौकशी करून 46 गावे व 33 आदिवासीवाड्यांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी उमटे धरणातील गाळ काढण्याच्या संदर्भात कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, असा तारांकित प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात दाखल केला होता.
या प्रश्नावर राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले की, उमटे धरणातील गाळ काढण्यास विलंब होत असल्याची बाब खरी असून या कामासाठी तीन वेळा निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. तथापि, त्यास प्रतिसाद प्राप्त झाला नाही. या कामाकरीता पुन्हा निविदा प्रक्रिया सुरू आहे. उमटे धरण हे उमटे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेचा उद्भव आहे. उमटे धरणातील गाळ काढल्यानंतर या धरणाची पाणी साठवण क्षमता वाढणार आहे. त्यामुळे योजनेतील समाविष्ट गावे, वाड्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या कामाची निविदा तीन वेळा प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यास प्रतिसाद प्राप्त झाला नाही. पुन्हा चौथ्यांदा निविदा प्रसिद्ध करून निविदा मंजुरीबाबत अंतिम कार्यवाही सुरू आहे तसेच उमटे धरणातून या गावांना व वाड्यांना पाण्याचा पुरवठा सुरू आहे, अशीही माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply