ग्रामस्थ आक्रमक; पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांची दांडी
पाली : प्रतिनिधी
सुधागड तालुका समन्वय समितीची पहिली बैठक तहसील कार्यालयाच्या हिरकणी कक्षात नवनिर्वाचित अध्यक्ष अभिजित चांदोरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. समितीच्या अध्यक्षांनी उपस्थित अधिकार्यांकडून त्यांच्या खात्याचा आढावा घेतला. या वेळी एमएसआरडीसी, पाटबंधारे, एसटी महामंडळ तसेच अन्य विभागातील अधिकारी या बैठकीला उपस्थित नव्हते त्यांना नोटीस बजावण्यात आली.
सुधागड तालुक्यातील समस्या संदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली. तालुक्यातील खवली ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या कवेळे धरणातील पाणी ग्रामपंचायत व गावांना पूर्वसूचना न देता दुरुस्तीसाठी सोडण्यात आले. त्यामुळे वाघोशी व खवली ग्रामपंचायत हद्दीतील गावांवर पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थ समन्वय समितीच्या बैठकीत आक्रमक झाले होते. यामधे पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांची चूक आहे. त्यांनी ग्रामस्थांना विश्वासात घेणे गरजेचे होते. याविषयी संबंधित अधिकार्यांना प्रश्न विचारला जाईल. व यावरती उपाययोजना केली जाईल, असे अध्यक्ष अभिजित चांदोरकर यांनी सांगितले. या बैठकीत अनेक समस्याबाबत चर्चा झाली. पावसाळ्यापूर्वी करण्यात येणार्या कामांबाबत संबंधित अधिकार्यांना विचारणा करण्यात आली. केलेल्या व करण्यात येणार्या कामांचा आढावा घेतला.
समन्वय समितीचे राजेंद्र राऊत, दीपक पवार, प्रकाश आवस्कर, राजेश कानाडे, किसन उमटे, स्वेता मालुसरे, इरम पानसरे, तहसीलदार दिलीप रायन्नावर, पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे, गटविकास अधिकारी विजय यादव, नायब तहसीलदार वैशाली काकडे यांच्यासह सर्व शासकीय अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.