पेण : प्रतिनिधी
नगर परिषदेच्या माध्यमातून करण्यात येत असणार्या स्वच्छ अभियानांतर्गत कार्यालयाच्या आवारातील भिंतीवर विविध प्रकारची चित्रे रेखाटून, सुविचार लिहून नागरिकांमध्ये स्वच्छतेचा संदेश देण्याचे काम करण्यात आले आहे.
स्वच्छता हीच सेवा हे ब्रीदवाक्य घेऊन स्वच्छता सर्वेक्षण अंतर्गत पेण नगर परिषदेने विविध उपक्रम हाती घेतले असून, शहरातील महिला, विद्यार्थी यांच्याबरोबर कर्मचार्यांनाही स्वच्छतेचे धडे गिरविण्यासाठी स्पर्धात्मक उपक्रम राबविण्याचे काम हाती घेतले आहे. नगर परिषद कार्यालयाच्या आवारातील भिंतीवर कर्मचार्यांकडूनच सुविचाराचे संदेश लिहून घेण्यासाठी स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये यशस्वी ठरलेल्या कर्मचार्याच्या नावासकट येथील भिंतीवर सुविचार रेखाटण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांमध्ये प्लॅस्टिकविषयी जनजागृती व्हावी, या उद्देशाने शिक्षकांकडे चॉकलेटचे रॅपर जमा करून या बदल्यात विद्यार्थ्यांना मुख्याधिकारी यांच्या उपस्थितीत खाऊचे वाटप करण्यात आले. पेण नगर परिषदेच्या उपक्रमाला शहरातील नागरिकांनी चांगल्या प्रकारे साथ दिली. पेण शहरातील स्वच्छ सर्वेक्षण चांगल्या प्रकारे यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही, अशी प्रतिक्रिया मुख्याधिकारी अर्चना दिवे यांनी दिली.