Breaking News

…तर चौदा वर्षे जेलमध्ये राहण्यास तयार -नवनीत राणा

मुंबई : प्रतिनिधी

मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा आणि त्यानंतरच्या नाट्यमय घडामोडींमुळे चर्चेत असलेल्या खासदार नवनीत राणा यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली होती. समर्थकांनी भगवी शाल, हनुमान चालिसेची प्रत आणि हनुमानाची प्रतिमादेखील नवनीत राणा यांना भेट देण्यात आली आणि औक्षणही करण्यात आले.

यावेळी माध्यमांशी बोलताना नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे सरकारवर कडाडून टीका केली आहे. मी अशी कोणती चूक केली, जिची मला शिक्षा मिळाली, असा सवालही त्यांनी ठाकरे सरकारला केला आहे. राणा म्हणाल्या, हनुमान चालिसा पठण, रामाचं नाव घेणं, गुन्हा आहे, त्यासाठी मला 13-14 दिवस शिक्षा सरकारने दिलीये. जर हा गुन्हा आहे तर मी 14 वर्षे जेलमध्ये राहण्यास तयार आहे. जर तुम्हाला वाटत असेल की ही महिला 14 दिवसांत शांत बसेल तर लक्षात घ्या तुम्ही 14 दिवसांत महिलेचा आवाज दाबू शकणार नाही. ही लढाई देवाच्या नावाची आहे, ही लढाई पुढेही सुरू ठेवणार. ज्या पद्धतीने माझ्यावर कारवाई झाली, जनतेने महिलेवर केलेली ती क्रूर कारवाई पाहिलीये, सर्वांना त्याबद्दल खेद आहे.

राणा दाम्पत्यावर दाखल केलेला राजद्रोहाचा गुन्हा चुकीचा आहे, असं निरीक्षण मुंबई सत्र न्यायालयानं नोंदवलं आहे. त्यानंतर आमदार रवी राणा यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. राज्यात द्वेषाचं राजकारण केलं जात आहे. त्यांनी एका महिलेला तुरुंगात कुठलेही उपचार दिले नाहीत, असा आरोप रवी राणा यांनी केला.

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply