Breaking News

नेरळच्या ब्रिटिशकालीन धरणातील गाळ काढणार

कर्जत : बातमीदार

नेरळ ग्रामपंचायतीच्या मालकीचे ब्रिटिशकालीन धरण असून त्या धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साठला आहे. तो गाळ काढण्यासाठी ग्रामपंचायतीने धरणातील सर्व पाणी सोडून दिले असून, लवकरच गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात येईल, अशी माहिती नेरळ ग्रामपंचायतीकडून देण्यात आली आहे.

नेरळ ग्रामपंचायतचे ब्रिटिशकालीन धरण असून त्या धरणात गावातील गणेश मूर्तीचे विसर्जन केले जाते. या धरणात मोठ्या प्रमाणात निर्माल्य आणि कचरादेखील टाकला जातो. धरणात प्लास्टिक पिशव्या आणि पावसात वाहून आलेली माती यांचा गाळ साचला आहे, त्यामुळे धरण अर्धे भरले असून जलपर्णीचा विळखा वाढला होता. या ब्रिटिशकालीन धरणातील गाळ काढण्याची मागणी  सामाजिक कार्यकर्ते संदीप उतेकर यांनी केली होती.

नेरळ ग्रामपंचायतीने गाळ काढण्यासाठी या ब्रिटिशकालीन धरणातील सर्व पाणी सोडून दिले आहे. तीव्र उन्हाळामुळे धरणातील सर्व गाळ सुकून गेला आहे. त्यामुळे धरणात जेसीबी मशीन घुसवून गाळ काढणे शक्य होणार आहे. धरणातील गाळ आणि प्लास्टिक कचरा काढण्यापूर्वी नेरळ ग्रामपंचायत सदस्यांनी धरण परिसराची पाहणी केली. त्यानंतर सरपंच उषा पारधी आणि उपसरपंच मंगेश म्हसकर यांनी धरणातील गाळ काढण्याचे काम हाती घेणार असल्याची माहिती दिली. दरम्यान, खत म्हणून वापरता येईल, अशी धरणातील माती कोणत्याही शेतकर्‍याला न्यायाची असेल तर त्यांनी घेऊन जावी, असे आवाहन नेरळ ग्रामपंचायतीने केले आहे.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply