पनवेल : रामप्रहर वृत्त
महाराष्ट्र शासन कृषी विभाग व महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित (महाबीज) यांच्या संयुक्त विद्यामानाने पनवेल तालुक्यातील भोकरपाडा/खानावळे या गावांत ग्राम बिजोत्पादन कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमात सचिन पाटील उपव्यवस्थापक ठाणे विभाग महाबीज यांनी ग्रामबिजोत्पादनसंदर्भात उपस्थित शेतकर्यांना मार्गदर्शन केले. ग्राम बिजोत्पादन मोहिमेंतर्गत महाबीजमार्फत शेतकर्यांना बियाणे उत्पादन कार्यक्रमात सहभागी करून घेण्यात येणार असून सहभागी शेतकर्यांना जया वाणाचे पायाभूत प्रकारचे भात बियाणे शासकीय दरात महाबीज मार्फत पुरवठा केला जाणार आहे, तसेच पेरणीपासून कापणीपर्यंत पिकाच्या विविध अवस्थेत भेटी देवून शेतकर्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शेतकर्यांनी उत्पादित केलेले बियाणे महाबीजला विक्री करणे बंधनकारक असून महाबीज महामंडळ हे शासनाच्या किमान आधारभूत किमतीच्या 20 टक्के जास्त दराने खरेदी करणार आहे. यासोबत बियाणे विक्रीसाठी लागणार्या पिशव्या व हमाली रक्कम सुद्धा दिली जाणार आहे.
या अभिनव उपक्रमात गावातील शेतकर्यांनी सहभाग घेण्यासाठी पनवेलचे मंडळ कृषी अधिकारी आर. आर. पाचपुते यांनी आवाहन केले. या कार्यक्रमादरम्यान उपस्थित सर्व शेतकर्यांमध्ये ग्रामबिजोत्पादन कार्यक्रमाबाबत उत्साह व सहभागी होण्यास उस्फूर्तपणे अनुमती दर्शविली. या कार्यक्रमास गावचे पोलीस पाटील दत्तात्रेय गोविंद पाटील, प्रकाश आगिवले, कृषी सहाय्यक संगीता पाटील उपस्थित होते.