अलिबाग : प्रतिनिधी
रायगड प्रीमिअर लीगने आयोजित केलेल्या विमेन्स क्रिकेट स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी पोयनाडच्या झुंझार युवक मंडळाच्या क्रीडांगणावर दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर व दोन सराव सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये संपूर्ण जिल्ह्यातून 40 मुलींनी सहभाग नोंदविला. कोलाडच्या मैदानावर निवड चाचणी घेऊन नोंदणीकृत झालेल्या सर्व मुलींना विविध संघांमध्ये विभागून त्यांच्यात रायगड विमेन्स प्रीमिअर लीग खेळविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील मुली अनेक ठिकाणी मुलांच्या संघांतून खेळताना दिसतात. त्यांची क्रिकेटमधील कामगिरीदेखील उत्तम असते. अशा व अन्य सर्व क्रिकेट खेळणार्या मुलींना योग्य प्लॅटफॉर्म मिळत नव्हता. म्हणूनच रायगड प्रीमिअर लीगच्या समितीने पुढाकार घेऊन रायगड जिल्ह्यातील होतकरू मुलींसाठी विमेन्स प्रीमिअर लीगचे आयोजन करण्याचे ठरवले आहे. स्पर्धेच्या आधी पूर्वतयारी म्हणून पोयनाड येथील क्रीडांगणावर दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर व दोन सराव सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. भविष्यात रायगड जिल्ह्यातील मुलांबरोबरच मुलीदेखील चांगल्या दर्जाचे क्रिकेट खेळल्या पाहिजेत यासाठी आरपीएल प्रयत्न करणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मुलींच्या क्रिकेटवाढीसाठी मोठ्या प्रमाणावर लक्ष केंद्रित केले आहे. महाराष्ट्रातूनसुद्धा बर्याच मुली देशाच्या संघात खेळताना दिसतात. रायगड जिल्ह्यातील मुलीदेखील प्रतिभावान आहेत. गरज आहे ती त्यांना योग्य मार्गदर्शन आणि प्लॅटफॉर्म देण्याची. जिल्ह्याच्या विविध भागांतील मैदानावर विमेन्स प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धा आयोजित करून त्या त्या विभागातील मुलींना लेदर बॉल क्रिकेट खेळाकडे आकर्षित करण्याचा प्रयत आरपीएलच्या माध्यमातून होईल. पोयनाड येथील दोन दिवसीय शिबिरासाठी आरपीएलचे अध्यक्ष राजेश पाटील, जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष जयंत नाईक, डॉ. राजाराम हुलवान, संदीप जोशी, शंकर दळवी, प्रितम पाटील, महेंद्र भातिकरे, कौस्तुभ जोशी, झुंझार युवक मंडळाचे अध्यक्ष अन्वर बुराण, किशोर तावडे, दीपक साळवी, अजय टेमकर, सुजित साळवी, अॅड पंकज पंडित, प्रशिक्षक सागर सावंत, ऋषिकेश कर्णुक, उमाशंकर सरकार, संकेश धोळे, आदेश नाईक आदी उपस्थित होते.