Breaking News

भारतीय बॅडमिंटन संघाने रचला इतिहास

इंडोनेशियाचा पराभव करून पहिल्यांदाच जिंकला थॉमस कप

बँकॉक ः वृत्तसंस्था

थॉमस कप स्पर्धेत भारतीय बॅडमिंटन संघाने इतिहास रचला आहे. भारतीय पुरुष संघाने रविवारी (दि. 15) गतविजेत्या इंडोनेशियाचा 3-0 असा एकतर्फी पराभव करून या स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. भारताच्या लक्ष्य सेन आणि किदाम्बी श्रीकांतने एकेरीत, तर सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टीने दुहेरीमध्ये आपापले सामने जिंकून विजेतेपदावर नाव कोरले. पहिल्या सामन्यात पुरुष एकेरी गटात जागतिक क्रमवारीत नवव्या क्रमांकावर असलेल्या लक्ष्य सेनने जागतिक चौथ्या क्रमांकावरील अँथनी सिनिसुका गिंटिंगचा पराभव केला. दुसर्‍या सामन्यात सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीने दुहेरीत इंडोनेशियन जोडी केविन संजय आणि मोहम्मद अहसान यांचा पराभव केला, तर तिसर्‍या सामन्यात किदाम्बी श्रीकांतने जोनाथन क्रिस्टीचा पराभव करीत भारताला प्रथमच थॉमस कपचे चॅम्पियन बनवले. भारताने या स्पर्धेत चायनीज तैपेईविरुद्ध फक्त एकच सामना गमावला. दुसरीकडे 14 वेळच्या चॅम्पियन इंडोनेशियाने एकही सामना गमावला नाही आणि बाद फेरीत चीन आणि जपानला नमवून अंतिम फेरी गाठली होती. अखेर इंडोनेशियाला भारताने मात देऊन बाजी मारली. भारताच्या या ऐतिहासिक विजयानंतर यशस्वी बॅडमिंटनपटूंचे देशभरातून कौतुक होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, क्रीडामंत्री किरण रिजीजू यांनी ट्विटरवरून भारतीय बॅडमिंटनपटूंचे अभिनंदन केले आहे.

Check Also

लोकनेते दि. बा. पाटील यांना रक्तदानातून आदरांजली

पनवेलमध्ये शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल उरण आगरी समाज मंडळाच्या वतीने शेतकरी, कामगार …

Leave a Reply