Breaking News

खालापुरात अनेक पक्ष्याच्या प्रजाती बेघर

बेसुमार वृक्षतोडीचा परिणाम

खोपोली : प्रतिनिधी

विकासाच्या नावाखाली खालापूर तालुक्यात बेसुमार वृक्षतोङ झाली असून, वनसंपदेबरोबर वन्यजीव संपदेवरदेखील घाला घातला आहे.

खालापूर तालुक्यातून राज्यमार्ग, राष्ट्रीय महामार्ग आणि मुंबई-पूणे द्रूतगती महामार्ग जातो. पाली-खोपोली, पेण-खोपोली, पळसदरी-कर्जत या राज्यमार्गाच्या रुंदिकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. मुंबई-पूणे राष्ट्रीय महामार्गावर खालापूर ते खोपोली रुंदिकरणाचे   कामदेखील झाले आहे. याशिवाय द्रूतगती महामार्गासाठी अधिकच्या मार्गिकेचे काम, घाटमार्गे सुरू आहे. या सर्व कामात बळी मात्र वृक्षांचा जात असून शंभर वर्षाचे वृक्षदेखील काही मिनिटांत कटरने आडवे झाले आहेत. त्यामुळे या वृक्षावर वर्षानुवर्ष वास्तव्य करून असलेल्या पक्ष्यांना मात्र हक्काचा निवारा गमवावा लागला आहे. खालापूरात ठेकेदाराच्या निर्दयीपणामुळे पोपट आणि पिल्लांचा मृत्यू झाल्यानंतर पक्षी, प्राणी मित्रांचा संताप अनावर झाला होता. डोळ्यादेखत तडफडून झालेल्या पोपटांचा मृत्यूनंतरही ठेकेदाराचे काम सुरू असल्याने निर्दयीपणाचा कळस झाला होता.

पाली-खोपोली मार्गावरदेखील तशीच परिस्थिती असून महाकाय वृक्षांच्या कत्तलीमुळे वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. दुर्देवाची बाब म्हणजे प्रशासनदेखील तोडणार्‍या वृक्षांच्या बदल्यात अनामत ठेव घेवून मोकळे होत असून, त्यावर वास्तव्य असलेल्या जिवांचे मोल, संगोपनबाबत उदासीन आहे. वृक्षतोड करण्यापूर्वी या मुक्या जिवांचा विचार व्हावा, अशी पक्षीमित्रांची अपेक्षा आहे.

खालापूर ते खोपोली परिसरात सुमारे साडेतीनशे झाडे तोडण्यात आली आहेत. खालापूर नगरपंचायतीने 129 वृक्ष तोडण्याची परवानगी देताना ठेकेदाराला एक वृक्षाच्या बदल्यात पाच वृक्ष लावण्याचे आदेश दिले होते. तर खोपोली नगर परिषदेने 212 वृक्षतोडीला परवानगी देताना 1060 नवीन वृक्ष लागवडीचे बंधन ठेकेदाराला घातले आहे. शिवाय एका झाडामागे पाच हजार रूपये अनामत रक्कम घेतली आहे. मात्र पक्ष्याच्या अधिवासांचे काय? याबाबत स्पष्टता नाही.

वीस वर्षापासून खालापूर तालुक्यात हजारो झाडांवर केवळ रस्त्यासाठी कुर्‍हाड चालवली गेली आहे. खालापुरातून द्रूतगती मार्गाला जोड रस्ता देताना दिडशेपेक्षा अधिक मोठी झाडे तोडण्यात आली होती. याशिवाय द्रूतगती मार्गावर तर गणतीच नव्हती. कारण हा रस्ता डोंगर आणि टेकडी आणि निसर्गसंपदा असलेल्या भागातून गेला आहे. येत्या दोन वर्षात रस्त्याच्या कामात खालापूर हद्दीतील पाच हजारपेक्षा जास्त झाडे भुईसपाट होणार आहेत.

निसर्गाच्या साखळीतील महत्त्वाचा घटक पक्षी आणि प्राणी आहे. वृक्ष लागवडीपुरता विचार करताना बेघर होणार्‍या पक्ष्यांना अधिवास मिळणे आवश्यक आहे.

-योगेश शिंदे, पक्षी-प्राणीमित्र, खालापूर

Check Also

पनवेलमध्ये महायुतीकडून जोमाने प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलला विकासाच्या दिशेने नेणारे कर्तृत्वत्वान आमदार प्रशांत ठाकूर चौथ्यांदा या विधानसभा …

Leave a Reply