मुरूड : प्रतिनिधी
शिवसेना व भाजपला जातीयवादी पक्ष म्हणून हिणवायचे, आमच्याबद्दल भीती निर्माण करायची आणि मुस्लिमांची मते मिळवायची ही विरोधकांची कार्यपद्धती राहिली आहे, परंतु राष्ट्रवादी व शेकापने एवढ्या वर्षांत मुस्लिम समाजाचा फक्त मतांसाठी वापर केला. या मतांच्या जीवावर स्वतः कोट्यवधींची माया जमवली. त्या बदल्यात विधायक कामे मात्र केली नाही. मुस्लिम समाजासाठी राष्ट्रवादी व शेकापचे योगदान काय, असा सवाल ना. अनंत गीते यांनी मुरूड येथील जाहीर सभेत केला.
शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्षांचे रायगड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार व केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या प्रचारार्थ मुरूड येथे सोमवारी (दि. 15) जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी गीते बोलत होते.
व्यासपीठावर नाविद अंतुले, भाजपचे अलिबाग-मुरूड विधानसभा अध्यक्ष अॅड. महेश मोहिते, रायगड जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, नगराध्यक्षा स्नेहा पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रशांत मिसाळ, भाजपचे तालुका अध्यक्ष जयवंत अंबाजी, शिवसेना तालुकाप्रमुख ऋषिकांत डोंगरीकर, उपनगराध्यक्ष नौशीन दरोगे, भाजप महिला मोर्चा शहर अध्यक्ष नैनिता कर्णिक, विजू कवळे, शैलेश काते, अभिजीत पानवलकर, अल्पसंख्याक अध्यक्ष उस्मान रोहेकर, असगर मुल्ला, निसार मोर्बेकर, अल्ताफ खतिब, बादल उर्फ अक्रम कबले, कादीरशेठ बोधले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अॅड. मोहिते, उस्मान रोहेकर यांनीही भाषणातून तटकरेंचा समाचार घेतला.