Breaking News

काश्मीरमध्ये भाजप नेत्याची हत्या

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये संशयित दहशतवाद्यांनी भाजप नेते गुल मोहम्मद मीर यांची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यांच्यावर पाच गोळ्या झाडण्यात आल्या.  देशभरात लोकसभा निवडणुकांसाठी मतदान होत असताना काश्मीरमध्ये राजकीय नेत्याच्या हत्येने एकच खळबळ उडाली आहे.

शनिवारी रात्री तीन दहशतवादी मीर यांच्या नौगाम वोरिनाममधील घरात घुसले होते. त्यांनी मीर यांच्याकडे त्यांच्या गाडीची चावी मागितली आणि गाडी घेऊन जाताना मीर यांच्यावर गोळ्या झाडल्या. छातीत तीन, तर पोटात दोन गोळ्या लागल्यामुळे मीर यांचा जागीच मृत्यू झाला. 60 वर्षीय गुल मोहम्मद मीर हे जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्याचे भाजप उपाध्यक्ष होते. त्यांना परिसरात अटल नावाने ओळखले जात. त्यांनी जम्मू-काश्मीर विधानसभेची निवडणूकही लढवली होती. हत्याकांडानंतर पोलिसांनी नौगाम परिसरातील सुरक्षा वाढवली आहे.

दहशतवाद्यांच्या गोळीबारात जखमी झालेल्या मीर यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांकडून आरोपींचा कसून शोध घेतला जात आहे.

दरम्यान, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. पीडीपीच्या अध्यक्षा मुफ्ती आणि जम्मू-काश्मीर प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष जे. ए. मीर यांनीही मीर यांच्या हत्येचा निषेध केला, तर काश्मीर खोर्‍यातील शांतता भंग करणार्‍यांविरोधात आणि निष्पापांच्या हत्या करणार्‍यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply