Breaking News

वेश्वी, नवेदर-नवगावमध्ये विकास आघाडीचे सरपंच; अलिबागेतील दोन्ही ग्रामपंचायतीमध्ये शेकापचा पराभव

अलिबाग : प्रतिनिधी

शेकापचा बालेकिल्ला असलेल्या अलिबाग तालुक्यातील वेश्वी आणि नवेदर-नवगाव या ग्रामपंचायतिंच्या  सरपंचपदाच्या निवडणुकीत विकास आघाडीने  शेकापला जोरदार धक्का दिला. या दोन्ही ग्रामपंचायतीमध्ये शेकापचे थेट सरपंचपदाचे उमेदवार पराभूत झाले. वेश्वी ग्रामपंचायत सरपंचपदी विकास आघाडीचे गणेश भालचंद्र गावडे तर नवेदर-नवगाव ग्रामपंचयात सरपंचपदी विकास आघाडीच्या प्रियांती आदर्शन घातकी विजयी झाल्या. शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांचे वास्तव्य असलेल्या वेश्वी ग्रामपंचायतीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. गेली अनेक वर्षे येथे शेकापची सत्ता आहे. येथे शेकापला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. वेश्वी ग्रामपंचायतीवर सत्ता मिळविण्यात ग्राम परिवर्तन आघाडीला यश आले. आघाडीचे थेट सरपंचपदाचे उमेदवार गणेश गावडे 281 मताने विजयी झाले आहेत. गणेश गावडे यांना 1578 तर शेकापचे प्रफुल्ल पाटील यांना 1307 मते मिळाली. वेश्वी ग्रामपंचायतीच्या 11 पैकी सात सदस्य शेकापचे तर चार सदस्य आघाडीचे निवडून आले. नवेदर-नवगावमध्येही आघाडीनेच बाजी मारली.  थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत आघाडीच्या उमेदवार प्रियंती आदर्शन घातकी 655 मतांनी विजयी झाल्या. घातकी यांना 1525 तर त्यांच्या प्रतिस्पर्धी शेकापच्या उमेदवार अंकिता प्रणय जैतू यांना 1070 मते मिळाली. नवेदर-नवगाव ग्रामपंचायतीच्या 11 पैकी सात सदस्य शेकापचे तर चार आघाडीचे निवडून आले. या दोन्ही ग्रामपंचायतींची निवडणुक आमदार महेंद्र दळवी आणि शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी प्रतिष्ठेची बनवली होती. यात आमदार महेंद्र दळवी यांनी बाजी मारली. विजयानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

अलिबाग तालुक्यातील वेश्वी आणि नवेदर-नवगाव या दोन्ही ग्रामपंचायती शेकापचे बालेकिल्ले होते. या दोन्ही ग्रामपंचायती आम्ही एकत्र येऊन जिंकल्या आहेत. ही अलिबाग तालुक्यातील राजकीय परिवर्तनाची लाट आहे. यापुढे होणार्‍या निवडणुकादेखील आम्ही एकत्र येऊनच लढावू. जिल्हा परिषद निवडणुकीतदेखील एकत्र येऊन सत्ता मिळवू.

-महेंद्र दळवी, आमदार, अलिबाग

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply