Wednesday , February 8 2023
Breaking News

इमारतींवरील शेडला परवानगी द्यावी

आमदार प्रशांत ठाकूर यांची विधानसभेत मागणी

पनवेल ः प्रतिनिधी
पावसामुळे इमारतीला लागणारी गळती रोखण्यासाठी रहिवासी सोसायट्यांच्या इमारतींवर अनेक ठिकाणी पत्र्याचे शेड टाकले जातात. पत्र्यावर शेड टाकण्यासाठी परवानगी नसल्यामुळे यावर कारवाई केली जाते. मोठ्या प्रमाणात पाऊस होणार्‍या भागात पत्र्याचे शेड गरजेचे असून त्याला परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात केली.
पनवेल महापालिकेसह इतर अनेक नगरपालिका, महापालिका क्षेत्रात इमारतींवर सर्रास पत्र्याचे शेड टाकले जातात. पावसाळ्यात पाणीगळती रोखण्यासाठी वापरण्यात येणारे पत्रे इतर वेळी सोसायटीच्या विविध कारणांसाठी उपयुक्त ठरतात, मात्र महापालिका अधिनियमानुसार आणि न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार हे पत्रे बेकायदा ठरविले जातात. नागरिकांच्या तक्रारींमुळे पत्र्याची शेड बेकायदा ठरवून काढण्यासाठी नोटीस दिली जाते. पत्र्याचे शेड बसविण्यासाठी सोसायट्यांना परवानगी देऊन पाण्याच्या बचतीसाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगची सक्ती करावी, म्हणजे हे पाणी संबंधित सोसायटीलादेखील वापरता येईल. महापालिकेने यासाठी शुल्क आकारून पत्र्याच्या शेडला परवानगी द्यावी. त्यामुळे सरकार, नगरपालिका, महापालिकेलासुद्धा या माध्यमातून महसूल मिळू शकतो, अशी सूचना त्यांनी मांडली. पनवेल परिसरात असलेले पत्र्याच्या शेडची मोठी संख्या लक्षात घेऊन आमदार प्रशांत ठाकूर यांनी ही मागणी केली.
पाणीपुरवठा योजना रखडली
पनवेल महापालिका क्षेत्र आणि अन्य परिसराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी मे महिन्यामध्ये निविदा प्रसिद्ध करण्यात आली. काही कारणास्तव या निविदेला मुदतवाढ मिळाल्यामुळे निविदा मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. यासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घेतला, तर भविष्यातील पिण्याच्या पाण्याचा तुडवडा दूर होईल. त्यासाठी सरकारने तातडीने कार्यवाही करावी, अशीही मागणीही आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी केली.

Check Also

लोकनेते दि. बा. पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण

पनवेल : वार्ताहर परमपूज्य स्वामी अक्षयानंद सरस्वती महाराज यांच्या प्रेरणेने अक्षयधाम मंदिराचा आठवा वर्धापन दिन …

Leave a Reply