महाड : प्रतिनिधी
’जगात भारी 19 फेब्रुवारी’ अशी धुन आणि मोठ्या उत्साहात महाड तालुक्यातील ग्रामीण भागात मंगळवारी शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. ढोल ताशाच्या आणि लेझिम नृत्याच्या तालावर गावागावातून शिवज्योतींचे महाडमध्ये आगमन झाले. नगरपालिकेच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवज्योतींचे स्वागत करण्यात आले. यावेळी मोहोप्रे व इतर गावांत सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. शिवजयंती महाडच्या तालुक्यातील ग्रामीण भागातून मोठ्या उत्साहात आणि ढोल ताशांच्या गजरात साजरी करण्यात आली. किल्ले रायगड आणि किल्ले प्रतापगडावरुन हजारो शिवज्योत रवाना झाल्या. उपनगराध्यक्ष वजिर कोंडीवकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजेय भोसले आणि तालुकाध्यक्ष जयवंत दळवी आणि नगरसेवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी नरविर तानाजी मालुसरे यांचे 13 वे वंशज रायबा शिवराज मालुसरे यांना सन्मानित करण्यात आले. तसेच येणार्या शिवज्योतींचे स्वागत केले.महाड शहरापेक्षा ग्रामीण भागात शिवजयंती उत्साह पहावयास मिळाला. मोहोप्रे गावात शिवज्योती बरोबरच रायगड येथून शिवरायांची पालखी मिरवणूक वाजतगाजत आणण्यात आली. ओमसाई मित्रमंडळ, ओमसाई क्रिकेट क्लब, ग्रामस्थ आणि महिला मंडळाच्या वतीने गावात दुपारी शिवज्योत आणि शिवमुर्तीची स्थापना करण्यात आली.