पनवेल : रामप्रहर वृत्त
ज्याच्या कामात कोणताही राग-लोभ नसतो आणि केवळ चांगले काम करण्याची प्रामाणिक इच्छा असते, असे रवीशेठ यांचे व्यक्तिमत्व आहे. भाजप हा देशातील सर्वात मोठा पक्ष असून आज पनवेल पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकला आहे, तसेच जिल्हा परिषदेची सूत्रेही आता आपल्याच हातात आहेत आणि या यशात रविशेठ पाटील यांचा मोलाचा वाटा आहे असे प्रतिपादन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी वहाळ येथे केले. तसेच बंडखोर आणि विरोधकांवर निशाणा साधताना कडक शब्दांत टीका केली. वेळ आल्यावर ज्याची त्याला जागा दाखवावी लागते आणि ते काम आता आपल्याला करायचे आहे. ज्यांच्या हातात सगळी सूत्रे दिली होती, मात्र सर्व काही आपल्यालाच पाहिजे या हव्यासापोटी जे सोडून पळाले, त्यांच्या नशिबात आता धोंडाच आला आहे, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. भाजप नेते रविशेठ पाटील यांचा वाढदिवस मंगळवारी वहाळ येथील साई मंदिरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्याला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उपस्थित राहून रवीशेठ पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान, या सोहळ्याचे औचित्य साधून गव्हाण जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्या निकिता खारकर, चाणजे जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्या रिना घरत, गव्हाण पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सदस्या जिज्ञासा कोळी, वहाळ पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य वितेश म्हात्रे आणि चाणजे पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य कैलास भोईर यांचा जाहीर सत्कार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला भाजपचे ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, उत्तम कोळी, निलेश खारकर, किशोर पाटील, धिरज ओवळेकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.
Check Also
Test post title
Test post content
RamPrahar – The Panvel Daily Paper