छत्रपती शिवाजी महाराज रेल्वेस्थानकावर उतरून बाहेर पडणार्या आजच्या जेन झी पिढीतील काही जण पलिकडच्या फूटपाथवरील एक तर मॅकडोनाल्डमध्ये जातात, तर काही जण रांगेत उभे राहून आरामचा वडापाव खातात. ग्लोबल युगातील या डिजिटल पिढीला सांगावेसे वाटते, आपण वडापाव खाताय ते कॅपिटल चित्रपटगृहाबाहेर उभे राहून खाताय. चित्रपट रसिकांच्या मागील अनेक पिढ्यांना हे कॅपिटल थिएटर अतिशय उत्तम रितीने ज्ञात आहे. जुन्या मुंबईतील हे इंग्रजकालीन चित्रपटगृह. काही वर्षांपूर्वी या चित्रपटगृहातीलही खेळ बंद झाला आहे. आज ही इमारत उभी असून ती आता 98 वर्षांची झाली आहे.
गिरगावात लहानाचा मोठा होताना दक्षिण मुंबईतील कुलाबा येथील रिगल चित्रपटगृहापासून ताडदेवच्या गंगा जमुना चित्रपटगृहापर्यत सर्वच चित्रपटगृहात जाऊन रांगेत उभे राहून तिकीट काढत अनेक पिक्चर (त्या काळात सिनेमा, चित्रपट, फिल्म यापेक्षा पिक्चर असेच म्हणत) एन्जॉय केले, त्यात कॅपिटल थिएटरही होते.
कॅपिटल थिएटरची काही खास वैशिष्ट्ये. प्रत्येक एकपडदा चित्रपटगृह अर्थात सिंगल स्क्रीन थिएटर्स एकापेक्षा वेगळे. प्रत्येकाचे आपलं एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व.
एखाद्या चित्रपटगृहातील जवळपास प्रत्येक शनिवारी दुपारी तीन व सायंकाळी सहाचा शो हमखास हाऊसफुल्ल व्हायचाच असे चित्रपटगृह होते कॅपिटॉल. आज इमारत निस्तेजपणे उभी आहे इतकेच. शांत असली तरी ती लक्ष वेधते. मुंबई महानगर पालिकेच्या मुख्य इमारतीसमोर ती आहे असेही म्हणता येईल.
अतिशय जुन्या मुंबईची ओळख असलेली ही वास्तू लक्षवेधक आहे. आपल्या देशात चित्रपट माध्यम व व्यवसाय रूजत असताना मुंबईत एकेक करत नवीन चित्रपटगृह जन्माला आले त्यातील हे एक. अधिक तपशील मिळवता असता समजले की ही मजबूत इमारत 1879 साली बांधण्यात आली. ही हेरिटेज वास्तू आहे. कुनवरजी पघटीवाला यांनी ती त्या काळानुसार व्हीक्टोरियन कल्चरची ठेवण अशी ही वास्तू उभारली. आणि शनिवार व रविवारी येथे एखाद्या मराठी, गुजराती अथवा इंग्लिश नाटकाचा प्रयोग होत असे. ते तेवढे पुरेसेही असे. आठवड्याच्या अखेरीस मनोरंजन अशी तेव्हा कॉन्स्पेक्ट होती. काही वर्षांनी म्हणजे 28 जानेवारी 1928 रोजी रंगमंचाचे रुपांतर चित्रपटगृहात केले. अर्थात, आता ’रुपेरी पडदा’ आला आणि देश विदेशातील मूकपट येथे प्रदर्शित होऊ लागले.
1929 साली सिधवा कुटुंबाने कॅपिटल थिएटर विकत घेतले. काही वर्षातच ’आपल्या देशात चित्रपट बोलू लागला’.. जनसामान्यांपर्यंत चित्रपट पोहचवायचा तर चित्रपटगृह हवीत ही स्वाभाविक भावना होतीच. चित्रपट इतिहासातील हीदेखील एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट. प्रेक्षकांपर्यंत चित्रपट कसा पोहोचला हे जास्त महत्वाचे. शंभर वर्षांपूर्वीची मुंबई ही जेमतेम सायन वांद्रे येथपर्यंतचीच होती आणि त्यात कसलीही दाटीवाटी नव्हतीच. इंग्रजकालीन दक्षिण मुंबई हा शहर रचना अभ्यासक्रमाचा आणि इतिहासाचा सखोल वेध घेण्याचा वेगळाच विषय आहे. आणि त्यात ही त्या काळातील चित्रपटगृह. अतिशय मजबूत आणि वैशिष्ट्यपूर्ण. ती वास्तू अनेक दृष्टीने महत्त्वाची.
कॅपिटॉल हे अगदीच मोक्याच्या ठिकाणी. जवळच एम्पायर होते. (कालांतराने ते न्यू एम्पायर झाले, तेही बंद झालेय.) तुलनेत स्टर्लिंग खूपच उशिरा म्हणजे आजच्या काळाचा विचार करता बावन्न त्रेपन्न वर्षांपूर्वी सुरु झाले. न्यू एक्सलसियर हे पूर्वीचे एक्सलसियर. अगदी फार पूर्वी त्याचे नाव नॉव्हेल्टी होते. एकंदरीत ’सिनेमा थिएटर पार्क’ म्हणावा असाच स्पॉट. कॅपिटल वगळता तीनही चित्रपटगृहात विदेशी चित्रपट मोठ्या प्रमाणात प्रदर्शित होत.
कॅपिटॉललाही सुरुवातीला सातत्याने इंग्लिश चित्रपट प्रदर्शित होत. मग हिंदी चित्रपट प्रदर्शित होऊ लागले. कधी एखाद्या आठवड्यात एकादा दक्षिण भारतीय प्रादेशिक भाषेतील चित्रपट प्रदर्शित होई. (एकदा ’हर नाईट्स’ या चित्रपटाच्या पोस्टरवरुन वादही झाला.) कधी कधी रविवार सकाळी नऊ वाजता असाच एकादा साऊथ इंडियन फिल्म असे. मुंबईतील साऊथचा चित्रपट ही एक वेगळीच आणि दीर्घकालीन गोष्ट.
कॅपिटल थिएटरची चित्रपट प्रदर्शित होण्याची प्रथा वेगळीच. खरंतर हा परिसर रविवार व सुट्टीचा दिवस वगळता कायमच प्रचंड रहदारीचा, गजबजलेला, धावपळीचा, गर्दीचा विभाग. याचे कारण अर्थातच पूर्वापार येथे अनेक प्रकारची अक्षरश: असंख्य लहान मोठी सरकारी आणि खाजगी कार्यालये. येथे नागरी वस्तीही आहे. तात्पर्य, कॅपिटॉलला लोकप्रिय चित्रपटाला लॉन्ग रनला म्हणजे रौप्यमहोत्सवी यशाला पूरक वातावरण. पण तरीही येथे असंख्य नवीन चित्रपट एक अथवा दोन आठवड्यांसाठी प्रदर्शित होत. अशी प्रथा. मधूनच त्या दिवसातील एखादा सुपर हिट चित्रपट एक आठवड्यासाठी येई. त्याला सेकंड रन म्हणत.
मी मिडियात आल्यावर या गोष्टीचा शोध घेतल्यावर समजले, अगदी सुरुवातीपासूनच चित्रपट वितरकांनी कॅपिटलकडे ’शॉर्ट टर्म’ म्हणूनच पाहिले. कुलाबा, बोरीबंदर परिसरातील डिफेन्स, स्ट्रॅन्ड, कॅपिटल, रेक्स, रेडिओ ही थिएटर्स मेन थिएटरला सपोर्ट सिस्टीम मानली गेली. म्हणजेच नाझ परिसरातील थिएटरमध्ये प्रदर्शित होत असलेला चित्रपट येथेही प्रदर्शित केला जाऊ लागला आणि मग वर्षांनुवर्ष तेच सुरू राहिले. रेडिओ थिएटरच्या जागेवर मनिष मार्केट आले. रेक्सही काळाच्या पडद्याआड गेले. मी गिरगावात राहत असल्याने मला कॅपिटॉल अनेकदा फळले. नाझ, ड्रीमलॅन्ड, नॉव्हेल्टी, मिनर्व्हा, नॉव्हेल्टी इत्यादीत अनेक सुपर हिट चित्रपटांची तिकीटे आगाऊ तिकीट खिडकीवरही मिळणे दिव्य असे, पण कॅपिटॉलला मधल्या वारी लवकर गेल्यावर तिकीट मिळण्याची हमी असे. गंगा थिएटरला ’मि. नटवरलाल’साठी जाण्यापेक्षा कॅपिटॉल बरे पडे. सत्तरच्या दशकात गिरगावातून 61, 65, 66, 69, 126 या क्रमांकापैकी कोणतीही बस पकडून दहा पैसे तिकीटात कॅपिटॉलला
जाता येई. पिक्चर संपल्यावर चालत यायलाही काहीच वाटत नसे. सुहाग, वो मै नही, घर, धरम करम, सबसे बडा रुपय्या वगैरे अनेक चित्रपट असेच पाहिले. नाझला एन्जॉय केलेला ’यादों की बारात’मध्येच एक आठवड्यासाठी कॅपिटॉलला लागला तेव्हा पुन्हा एन्जॉय केला. ते दिवसच वेगळे होते.
मीडियात आल्यावर कॅपिटॉलला जाणे कमी होत गेले तरी प्रेस शोला आवडलेले असे ’दिल’, ’हत्यार’ पुन्हा याच कॅपिटॉलला पाहिले. कॅपिटॉलला समोरच्या बाजूने करंट बुकिंगची खिडकी आणि इमारतीच्या डाव्या बाजूस आगाऊ तिकीट खिडकी, पण तिकीट काढताना अप्पर स्टॉलचे अगदी शेवटच्या दोन रांगेतील तिकीट नकोसे वाटे, कारण बाल्कनीच्या बरोबर खालीच ते असल्याने भले मोठे खांब दुर्लक्षित करून पडद्यावर लक्ष केंद्रित करावे लागे. तोही अडथळा पब्लिकने सहन केला. आपल्या देशातील चित्रपट संस्कृतीतील ही एक वेगळीच मजा. चित्रपटाचा इतिहासात पडद्यासमोरच्या गोष्टीही महत्त्वाच्या.
दक्षिण मुंबईतील अनेक कार्यालये पूर्वी शनिवारी अर्धा दिवस असत आणि अगदी वसई, विरार, डोंबिवली, नवी मुंबई असे सगळीकडचे नागरिक वर्षानुवर्ष या परिसरात नोकरी आणि सरकारी कामासाठी येताहेत. अनेकांना शनिवारी अर्धा दिवस ऑफिस सुटताच कॅपिटॉलला पिक्चर पाहून समोरच लोकल ट्रेन पकडून घरी जायला सवयीचे झाले होते. एकाच फेरीत दोन कामे होत. या विभागात एकाद्या मिटींगसाठी आल्यावर येथेच एकादा चित्रपट पाहणारे फिल्म दीवाने खूप होते. दक्षिण मुंबईत अनेक कॉलेजेस असल्याने तोही क्राऊड कॅपिटॉलला लाभे. पिक्चरच्या मध्यंतरला थिएटरला लागूनच आराम वडापाव हुकमी गरमागरम. आजही तो आहेच म्हणा आणि पिक्चर संपल्यावर उजव्या बाजूच्या इराणी हॉटेलमध्ये कटींग चहा, ब्रून मस्कासह त्याच पिक्चरवर भरपेट चर्चा. ते दिवसच वेगळे होते. हा इराणी काही वर्षांपूर्वी बंद झाला. कॅपिटॉलही बंद झाले. शांत झाले. या परिसरात गेल्यावर हमखास ते नजरेत पडते आणि जुने पिक्चर आठवतात. अधूनमधून याच कॅपिटॉलमध्ये ’पिक्चरचे शूटिंग’ झालेय. फराह खान दिग्दर्शित ’ओम शांती ओम’मधील थिएटर हेच आहे. शाहरुख खान, दीपिका पादुकोन यांच्यावरील काही दृश्ये येथेच चित्रीत झालीत. कॅपिटल थिएटरच्या इमारतीत कॅमेरा लावून समोरच्या रस्त्यावरही काही चित्रपटातील दृश्ये चित्रित झालीत. बाहेरगावाहून येणारा याच छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकावर उतरून बाहेर येतो असे दिसणारे दृश्य याच कॅपिटलमधून अनेकदा चित्रीत करण्यात आले. यामुळे सिनेमाच्या पडद्यावर कॅपिटॉल राहिलयं, पण प्रत्यक्ष कॅपिटॉलमधील शो केव्हाच संपलाय.
जुन्या पिढीतील चित्रपट रसिकांची चित्रपटगृहाशीही बांधिलकी होती. भावनिक ओढ होती. म्हणूनच एकेक करत जुनी सिंगल स्क्रीन थिएटर्स अर्थात एकपडदा चित्रपटगृहे बंद होत गेल्याने अनेक फिल्म दीवाने हळहळतात. चित्रपटगृह म्हणजे केवळ चार भिंती नसतात तर ते अनेक प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टींचे विश्व असते. अनुभव असतो. पडद्यावर चित्रपट सुरु असतो, प्रेक्षक आपापल्या आवडीनुसार तो त्याच पडद्याशी एकरुप झालेला असतो….टाळ्या, शिट्या, हशा याने तो दाद देतो.
आज मुंबई, महाराष्ट्र काय, देशभरातील अनेक एकपडदा चित्रपटगृह अर्थात सिंगल स्क्रीन थिएटर्स एकेक करत करत काळाच्या पडद्याआड गेली आहेत. राहिल्या फक्त आणि फक्त आठवणी.
दिलीप ठाकूर , चित्रपट समीक्षक
RamPrahar – The Panvel Daily Paper