दीपाली सय्यद यांच्यावर गुन्हा दाखल करा; खारघरमधील पदाधिकार्यांची मागणी
पोलीस अधिकार्यांना पत्र
खारघर : रामप्रहर वृत्त
अभिनेत्री दीपाली भोसले सय्यद हिने पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करत भाजप खारघर मंडलच्या वतीने दीपाली सय्यदवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी करण्यात आली. या मागणीचे लेखी निवेदन पदाधिकार्यांनी खारघर पोलिसांना दिले.
अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी शनिवारी (दि. 28) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले. मागील पंधरा दिवसांपूर्वीही खासदार किरीट सोमय्यांच्या गाडीवर हल्लाल्यानंतर समर्थन करताना त्यापुढे म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गाडीसुद्धा शिवसैनिकांनी फोडली असती असे विधान सोशल मिडीयावर करून एकप्रकारची खुलेआम धमकी दिली होती. पंतप्रधानपद हे संवैधानिक पद आहे. नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व राज्याने व देशाने स्वीकारले आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीयाने या पदाचा सन्मान करणे क्रमप्राप्त आहे. पंतप्रधानांचा अपमान व धमकी म्हणजे संविधानाचा अपमान आहे.
सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम करणार्या व देशाच्या पंतप्रधानावर खालच्या पातळीवर वक्तव्य करणार्या दीपाली सय्यद यांच्यावर लवकरात लवकर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी, अशी मागणी भाजप खारघर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी खारघर पोलीस निरीक्षक विमल बडवे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली.
दीपाली सय्यद यांच्याविरोधात घोषणाबाजी करत भारतीय जनता पक्षाने खारघर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार पत्र दिले आणि जोपर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलीस स्टेशन मधून हलणार नाही, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी केली. त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या वेळी भारतीय जनता पक्ष खारघर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेविका आरती नवघरे, जिल्हा चिटणीस गीता चौधरी, सरचिटणीस किर्ति नवघरे, जिल्हा उपाध्यक्षा संध्या शारबीद्रे, मंडल उपाध्यक्षा बिना गोगरी, मंडल उपाध्यक्ष संजय घरत, सरचिटणीस साधना पवार, उत्तर रायगड जिल्हा सोशल मिडीया संयोजिका मोना अडवाणी, ओबीसी मोर्चा सहसंयोजिका वैशाली प्रजापति, महिला मोर्चा उपाध्यक्षा प्रतीक्षा कदम, युवा मोर्चा सरचिटणीस अमर उपाध्याय, कामगार सेल संयोजक जयदास तेलवणे, मंडल चिटणीस सचिन वासकर, तालुका संघटक प्रभाकर जोशी, उत्तर भारतीय मोर्चा संयोजक विनोद ठाकूर, प्रसिद्धी प्रमुख प्रभाकर वांगर, शिक्षक सेल संयोजक संदीप रेड्डी, सेक्टर-20 अध्यक्ष विलास आलेकर, अशोक जांगिड़, शैलेन्द्र त्रिपाठी, जी. एन. गुप्ता, सुस्मित डोळस आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.