
पनवेल : वार्ताहर
उलवे मध्ये राहणार्या 28 वर्षीय बारबालेच्या घरामध्ये घुसलेल्या अज्ञात व्यक्तीने तिचा गळा आवळून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे. बेशुध्दावस्थेत असलेल्या या बारबालेवर नेरूळमधील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एनआरआय पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेतील जखमी तरुणी बारमध्ये काम करणारी असून पूर्वी ती मीरारोड येथे राहण्यास होती. ही तरुणी कोपरखैरणेतील बेला बारमध्ये कामाला असताना, तिची ओळख कळंबोली येथे राहणार्या हॉटेल व्यावसायिक तरुणासोबत होऊन त्याच्यासोबत तिची चांगली मैत्री झाली होती. त्यानंतर या दोघांमध्ये संपर्क वाढल्यानंतर हॉटेल व्यावसायिकाने या तरुणीला राहण्यासाठी उलवे, सेक्टर-19 मधील इमारतीत भाड्याने घर घेऊन दिले होते. या दोघांनी उलवे येथील घरामध्ये जेवण केल्यानंतर रात्री 9च्या सुमारास हॉटेल व्यावसायिक कळंबोली येथे आपल्या घरी निघून गेला. त्यानंतर मध्यरात्री 2च्या सुमारास हॉटेल व्यावसायिक तरुणाने तरुणीला फोन केला असता, तिने फोन उलचला नाही. त्यानंतर दिवसभर त्याने तीन-चार वेळा तरुणीला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरुणीने फोन न उचलल्याने सायंकाळी 7च्या सुमारास हॉटेल व्यावसायिक आपल्या दोन मित्रांसह उलवे येथे गेला. या वेळी त्याने आपल्याकडील चावीने दरवाजा उघडला असता, आतमध्ये तरुणी जखमी आणि बेशुध्दावस्थेत पडल्याचे निदर्शनास आली. त्यामुळे त्यांनी तिला तत्काळ जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले.
यानंतर पुढील उपचारासाठी तिला नेरूळ येथील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पीटलमध्ये दाखल केले. दरम्यान, तरुणी अद्याप बेशुध्दावस्थेत असल्याने तिला कुणी मारण्याचा प्रयत्न केला ते समजू शकले नाही. त्यामुळे एनआरआय पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper