Breaking News

काश्मीरचे खोरे हळूहळू बदलतेय…

काश्मीर म्हटले की, तेथील दहशतवादी, त्यांचे हल्ले एवढेच आपल्या डोळ्यासमोर येते, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींचे  सरकार आल्यापासून  तेथील परिस्थिती बदलत आहे. तेथील महिलांच्यात ही आत्मविश्वास निर्माण होत आहे, हा बदल निश्चितच चांगला आहे. काश्मीरमध्ये नसबंदीची शस्त्रक्रिया जवळ जवळ कोणीच करीतच नाही. त्यांना धर्म परवानगी देत नाही असे सांगितले जाते. अशा वेळी आमच्या शिबिरात बाहेरून डॉक्टर आले म्हणून लांबून लांबून महिला आल्या. आपण सकाळी येऊन नसबंदीची शस्त्रक्रिया करून संध्याकाळी घरी परत जाऊ शकतो याची खात्री त्यांना पटली. त्यामुळे आम्ही केलेल्या अडीच हजार शस्त्रक्रियांमध्ये 500पेक्षा जास्त नसबंदीची शस्त्रक्रिया झाल्या हिच खूप मोठी उपलब्धी असल्याचे पनवेलचे डॉक्टर गिरीश गुणे  यांनी सांगितले. बारामुल्ला, कुपीबारा, सोपोर आणि गांदरबल येथे रोटरी हेल्थ कॅम्पमध्ये 2500हून अधिक यशस्वी शस्त्रक्रिया करून आल्यानंतर ते आपले अनुभव सांगत आहेत…

काश्मीरचे विभागीय आयुक्त (डिव्हकॉम) पांडुरंग के. पोळे, रोटरी क्लब ऑफ इंडियाचे गव्हर्नर डॉ. राजीव प्रधान, संचालक आरोग्य सेवा काश्मीर डॉ. मुस्जताक अहमद राथेर, नोडल अधिकारी डॉ. तलत आणि ताहिर मगरे यांनी काश्मीरमधील बारामुला, कुपवाडा आणि गांदरबल या तीन जिल्ह्यांमध्ये मेगा आरोग्य शिबिर आयोजित केले होते. या शिबिरासाठी रोटरीच्या  45 डॉक्टरांची टिम काश्मीरला गेली होती. त्यामध्ये 2/3 डॉक्टर महाराष्ट्रातील होते. गुजरातमधील सूरत आणि बडोदामधून सहा, पंजाबमधील जालंधर, चंदिगड आणि अमृतसरमधील सहा ते सात जण होते. महाराष्ट्रातील 28मध्ये जळगाव,  जालना, अहमदनगर, सोलापूर, सातारा व रायगडमधील पनवेलचे डॉ. गिरीश गुणे आणि डॉ. अभय शेट्ये होते. डॉ. गिरीश गुणे यांनी सांगितले की, आम्ही सगळे आधीपासून एकमेकांना ओळखत होतो. आम्ही यापूर्वी ही 20 ठिकाणी गेलो होतो, पण काश्मीरमध्ये थोडे अवघड होते.

आपल्याकडे दरवर्षी रुग्णांवर होणार्‍या शस्त्रक्रियांपैकी 10 टक्के शासकीय हॉस्पिटलमध्ये होतात, तर काश्मीरमध्ये 95 टक्के शस्त्रक्रिया ह्या शासकीय हॉस्पिटलमध्ये होतात. कोव्हिडमुळे दोन वर्षे शासकीय हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया झाल्या नव्हत्या. त्यामुळे सात ते आठ हजार शस्त्रक्रिया बाकी होत्या. त्यांच्या येथील डॉक्टर रोज दोन-चार शस्त्रक्रिया करीत असल्याने हा बॅकलॉग कसा भरून काढायचा हा त्यांच्यापुढे प्रश्न होता. काश्मीर सरकारचे विभागीय आयुक्त पांडूरंग पोळे यांनी रोटरीकडे शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टर मागितले. त्यामुळे रोटरीतर्फे आम्ही 10 मे रोजी जाऊन तेथे कॅम्पमध्ये शस्त्रक्रिया करून 20 मे रोजी परत आलो.

बारामुल्ला, कुपवडा म्हणजे अतिरेक्यांचा अड्डा समजली जाणारी ठिकाणे. एके काळी माणूस बाहेर जाऊ शकत नव्हता रस्त्यावर उभा राहू शकत नव्हता आशा ठिकाणी आम्ही काम केले हे महत्वाचे. कुपीबारा, गांदरबल, बारामुल्ला आणि उपजिल्हा रुग्णालय सोपोर या चार सेंटरमध्ये दोन दिवसांत अडीच हजार शस्त्रक्रिया झाल्या. या शिबिरात अडीच हजार शस्त्रक्रियांमध्ये 500पेक्षा जास्त नसबंदीची शस्त्रक्रिया झाल्या. 550पेक्षा जास्त मोती बिंदूच्या लेन्स टाकून शस्त्रक्रिया झाल्या. कोणतीही अडचण न येता सुरळीतपणे दोन दिवसांचा कॅम्प झाला. स्थानिक लोकांचे सहकार्य तर चांगलेच होते. अनेकांनी आम्हाला त्यांच्या घरी येण्याचे आमंत्रण दिले. त्यांचे जेवण म्हणजे भात आणि मटण ते जेवण्याचा आग्रह केला. अनेकांनी आदरातीथ्याने बोलावले. यामुळे एक कटुता कमी होण्यास निश्चितच मदत झाली.

आम्ही रोटरीतर्फे 2017मध्ये ही अतिरेक्यांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या दंतवाडा येथे भोपी राहत यांनी घेतलेल्या कॅम्पला गेलो होता. तेथे जात असताना आम्हाला अनेकांनी सांगितले  तिथे जाऊ नका तुम्हाला मारून टाकतील. आम्ही स्थानिक लोकांजवळ बोलल्यावर त्यांनी सांगितले, तुम्ही काळजी करू नका आम्ही त्यांना निरोप पाठवतो. त्यांचा निरोप गेल्यावर आम्हाला सांगण्यात आले तुम्ही तुमचे काम करा तुम्ही सरकारी अधिकारी नाहीत आम्ही तुम्हाला त्रास देणार नाही तुम्हाला कोणी दिल्यास आम्हाला सांगा, आम्ही बघून घेऊ. यावेळी  मात्र आमची राहण्याची व्यवस्था काश्मीर सरकारने मिलिट्री कॅम्प मध्ये केली होती. त्यांनी आम्हाला शाश्वती दिली होती तुम्हाला काही होणार नाही. मिलिट्रीच्या गाडीतून सकाळी पूर्ण संरक्षणात  आम्हाला हॉस्पिटलला घेऊन जायचे. संध्याकाळी आमचे काम 7-8 वाजता जेव्हा संपेल तोपर्यंत थांबून आम्हाला पुन्हा कॅम्पमध्ये घेऊन येत असत.

बारामुल्ला, कुपीबारा आणि गांदरबल. रोटरी हेल्थ कॅम्प दरम्यान 2500 हून अधिक शस्त्रक्रिया करण्यात आल्या हे आरोग्य शिबीर संपले असले तरी उपजिल्हा रुग्णालय सोपोरसह छावणी रुग्णालयांना रोटरी सर्जन भेट देत राहतील. रोटरी गव्हर्नर डॉ. राजीव प्रधान यांनी विभागीय आयुक्त आणि संचालक यांचे आभार मानून सांगितले की, त्यांच्या व्यापक आणि सततच्या पाठिंब्यामुळेच आरोग्य शिबिर यशस्वी झाले आहे. विभागीय आयुक्त पांडूरंग पोळे यांनी, या शस्त्रक्रिया केवळ संख्येतच नव्हे तर या मेगा हेल्थ कॅम्पमध्ये आतापर्यंत आम्ही मिळवलेल्या संख्येत एक उत्तम यश आहे. त्यात शून्य गुंतागुंत होती हा आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा क्षण असल्याचे सांगून रोटरी क्लब इंडियाच्या शल्यचिकित्सकांनी केलेल्या कामाबद्दल त्यांनी धन्यवाद दिले.

या वेळी लेफ्टनंट गव्हर्नर यांनी मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेतलेल्या रुग्णांशी संवाद साधला आणि निरोगी समाजाच्या उभारणीसाठी मानवी सेवेला सर्वोच्च स्थान दिल्याबद्दल वैद्यकीय बंधू आणि रोटरी इंटरनॅशनलच्या सदस्यांचे कौतुक केले. या सर्व शस्त्रक्रिया आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत (गोल्डन कार्ड) मोफत करण्यात आल्या आणि लाभार्थ्यांनी खिशातून कोणताही खर्च केला नाही.

-नितीन देशमुख, खबरबात

Check Also

मुंबईजवळ समुद्रात बोट बुडून 13 जणांचा मृत्यू; 101 जणांना वाचवले

मुंबई : प्रतिनिधी मुंबईमधून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुधवारी (दि.18) सायंकाळी बुडाल्याची दुर्घटना घडली. …

Leave a Reply