खोपोली : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात अक्षेपार्ह विधान करणार्या शिवसेनेच्या दिपाली सय्यद यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी खोपोली शहर भाजप महिला मोर्चाच्या वतीने पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीसुद्धा गाडी शिवसैनिकांनी तोडली असती, असे विधान पंधरा दिवसापूर्वी शिवसेनेच्या दिपाली सय्यद यांनी प्रसार माध्यम व सोशल मीडियावर करून एक प्रकारे मोदी यांना धमकी दिली होती. पंतप्रधान हे संविधानीक पद असून, त्यांना धमकी म्हणजे संविधानाचा अपमान आहे, याबाबत भाजप महिला मोर्चा निषेध करीत आहे. अशा प्रकारचे वक्तव्य करणार्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करावी, अशी मागणी भाजप महिला मोर्चाच्या वतीने पोलिसांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
भाजप महिला मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्षा अश्विनीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे शहर अध्यक्ष इंदेरमल खंडेलवाल, सरचिटणीस हेमंत नांदे, प्रमोद पिंगळे, महिला मोर्चा शहर अध्यक्षा शोभाताई काटे, सरचिटणीस अश्विनीताई अत्रे, भाजप खोपोली शहर चिटणीस गोपाळ बावस्कर, ओबीसी सेल शहराध्यक्ष सुनील नांदे, वैद्यकीय सेलचे विकास खरपुडे, माजी नगरसेविका अनिता शहा यांच्यासह अन्य पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.