Breaking News

पद्मश्री डॉ. आप्पासाहेबांच्या कर्तुत्वाचा, प्रेमाचा सन्मान- ना. अमित शाह

लाखो श्रीसदस्यांच्या साक्षीने डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ प्रदान

पनवेल, नवी मुंबई ः प्रतिनिधी, बातमीदार
कोणत्याही प्रसिद्धीची आकांक्षा नसणारे, अशा आप्पासाहेबांच्या कौतुकासाठी आलेली ही प्रचंड गर्दी मी आयुष्यात कधीही पाहिलेली नाही. असा भक्तिभाव, केवळ त्याग, समर्पण यातूनच निर्माण होतो, हे आप्पासाहेबांचे गुणवैशिष्ट्य आहे. हा त्यांच्या कर्तुत्वाचा, प्रेमाचा सन्मान आहे, असे मत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केले. ते खारघर येथे डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना दिल्या जाणार्‍या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात बोलत होते.
ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने रविवारी (दि. 16) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. मुंबईतील खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर हा भव्य दिव्य सोहळा झाला. श्रीरामाची प्रतिमा देऊन डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी त्यांनी शाल, मानपत्र, 25 लाख रुपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह देत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या पुरस्कार सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, राज्य शिक्षण मंत्री दिपक केसरकर, उद्योगमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री शंभुराज देसाई, मंत्री रवींद्र चव्हाण, मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार श्रीरंग बारणे, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह रायगड भूषण डॉ. सचिनदादा धर्माधिकारी, समीरदादा धर्माधिकारी, यांच्यासह धर्माधिकारी कुटूंबिय, आमदार महेश बालदी, आमदार मंदा म्हात्रे, आमदार निरंजन डावखरे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, कोकण परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते, नवी मुंबई आयुक्त राजेश नार्वेकर, ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी, सहव्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे, रायगड जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलींद भारंबे, पनवेल महापालिका आयुक्त डॉ. गणेश देशमुख आदी या वेळी उपस्थित होते. यासोबतच हा अभूतपूर्व सोहळा याची देही, याची डोळा पाहण्यासाठी लाखो अनुयायांनी उपस्थिती लावली होती.
गृहमंत्री अमित शाह पुढे म्हणाले की, मी इतिहासाचा अभ्यासक आहे. लक्ष्मीची कृपा एखाद्या परिवाराला एखाद्या कुटुंबावर असते. एखाद्या परिवारात अनेक जण वीर असतात, सरस्वतीची कृपाही काही कुटुंबांवर पिढ्यात असते, मात्र समाजसेवेचा संस्कार तीन पिढ्या असणे हे प्रथमच पाहतोय. आप्पासाहेबांना सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन केवळ तुमचा सन्मान केला नाही, तर लाखो जनतेला या प्रकारे जगण्याची प्रेरणा दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची ही पुण्यभूमी आहे. राष्ट्रासाठी वीरता, सावरकर, चाफेकर, टिळक, फडके यांनी देशासाठी मोठे योगदान दिले आहे. भक्तीच्या विचारधारेत रामदास स्वामी, संत नामदेव, संत तुकाराम यांनी देशाला कायमच दिशा दाखविण्याचे काम केले आहे. सामाजिक बदलाची सुरुवातही महाराष्ट्रातूनच झाली असून महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. आंबेडकर यांच्यासारखे अनेक सामाजिक चळवळीचे प्रणेते राज्यात होऊन गेले. नानासाहेब आणि आप्पासाहेबांनी हेच काम पुढे सुरू ठेवले. समाजाला त्यांनी दुसर्‍यांना मदत करून त्यांना जगण्याची नवी उमेद दिली. जी कर्तुत्वाने शिकवण दिली जाते ती निरंतर असते. आप्पासाहेबांनी नेमकी हीच प्रेरणा दिली आहे. देशाला गरज असताना अशी मोठी फौज उभी केली आहे. म्हणूनच आप्पासाहेबांना पद्मश्री पुरस्कार दिला होता. महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात शिवसेना-भाजपाने केली. पु. ल. देशपांडे यांच्यापासून अनेकांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रथमच एकाच घरात दुसर्‍यांदा महाराष्ट्र भूषण देण्यात आला. यासाठी शुभेच्छा आणि अभिनंदन करण्यासाठी आलो. आपल्याला दीर्घायू मिळो आणि काम विस्तारत राहो, अशी प्रार्थना करतो, असे अमित शाह म्हणाले.
डॉ. सचिनदादा धर्माधिकारी म्हणाले की, मन, मानव व मानवता या विचारातून कार्य सुरू आहे. मनाचे विचार बदलण्यासाठी बैठकीच्या माध्यमातून कार्य केले जाते. चांगले संकल्प केले तर मानव व मानवतेचे विचार येऊ लागतात. सत्याचा संकल्प आला तर मानवतेचे दया, शांती, प्रेम हे विचार येऊ लागतात. हे विचार आले नाही तर समाजात हिंसा होते आणि हे समाजासाठी भयानक आहे. मन, मानव व मानवता हे सूत्रच बैठकीत दिले जाते. प्रशासन व सदस्यांच्या समन्वयातून एवढा मोठा कार्यक्रम होत आहे. रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आभार मानले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वतीने या वेळी लाखोंच्या संख्येने उपस्थित श्रीसदस्यांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.

माणूस घडवण्याचे विद्यापीठ रेवदंड्यात-मुख्यमंत्री

या महासागरासमोर काय बोलावे त्याचे शब्द सुचत नाहीत. आज मी मुख्यमंत्री म्हणून उभा नाही, तर आपल्या परिवारातील श्री सदस्य म्हणून या ठिकाणी उभा आहे. सर्वोच्च मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार माननीय डॉ. आप्पासाहेबांना गृहमंत्री अमितभाई शाह यांनी प्रदान केला आहे. राज्याच्या साडेबारा कोटी जनतेच्या वतीने शुभेच्छा आणि अभिनंदन करतो. ‘अरे माणसा माणसा कधी होशील माणूस’ ही ओळ खरी हे कार्य आप्पासाहेब करतायेत. माणूस घडवण्याचे विद्यापीठ म्हणजे मुक्काम पोस्ट रेवदंडा आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. सूर्य आग ओकत असताना, एकही माणूस जागचा उठत नाही. ही अप्पासाहेबांची ताकद आणि आशीर्वाद आहेत. श्री सदस्यांच्या बैठकीची शिस्त काय असते ती या ठिकाणी पाहायला मिळते आहे. माझी पत्नी आणि श्रीकांत देखील या श्री सदस्यांमध्ये बसलेले आहेत. इथे मोठा कुणी नाही, सगळे श्री सदस्य आहे. हा जनसागर आप्पासाहेबांच्या प्रेमापोटी परवापासून इथे पोहचलेला आहे. ही शक्ती आहे. आप्पासाहेबांना 2017 साली पद्मश्री मिळाला होता. त्यासाठी गृहमंत्री अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांना धन्यवाद देतो. अमितभाईंना जेव्हा जेव्हा भेटतो तेव्हा काम करण्याची प्रेरणा, संघर्षाचे बळ मिळते. काश्मिरातील 370 कलम हटले पाहिजे, राममंदिर झाले पाहिजे, हे पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात शाहांनी करून दाखवले. शाहांचा इतिहास, आध्यात्माचा चांगला अभ्यास आहे. राष्ट्रभक्तीचे संस्कार त्यांच्यावर होतोय. त्यामुळे हा दुर्धशर्करा योग आहे. अमित जी, जेव्हा तुम्ही मागे उभे राहता तेव्हा हिमतीने उभे राहता, हा अनुभव मला आणि फडणवीसांना आहे. हा पुरस्कार दिल्याने महाराष्ट्र भूषणची उंची वाढलीय. यापेक्षा आनंदाचा क्षण असू शकत नाही. आप्पासाहेबांना वंदन, आशीर्वाद असू द्या, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

श्री परिवारात संस्कारांची श्रीमंती -उपमुख्यमंत्री

जगात सात आश्चर्य आहेत, पण जेव्हा जेव्हा तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाला येतो तेव्हा हे आठवे आश्चर्य आहे असे वाटते, असे गौरवोद्गार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. माणसाची खरी श्रीमंती संस्काराची आहे. श्री परिवारात ती श्रीमंती पाहायला मिळते. आप्पासाहेब आणि नानासाहेब यांच्या विचारांची श्रीमंती घेऊन तुम्ही जगता. आप्पासाहेबांनी निरुपणातून त्यांनी जनतेची मनं स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला. या पुरस्काराच्या माध्यमातून सरकारने कृतज्ञता व्यक्त केली. हे कार्य महान आहे, सरकार म्हणून त्यांचे धन्यवाद मानू इच्छितो. हा विलक्षण योगायोग आहे. नानासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षात आप्पासाहेबांना पुरस्कार मिळतोय. नानासाहेब यांना सन्मान देताना आलेल्या गर्दीची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली. इतकी लोकं आली पण कचर्‍याचा तुकडाही नव्हता. तो रेकॉर्ड आज तुटला. धर्माधिकारी घराण्याचा इतिहास हा 450 वर्षांचा आहे. आप्पासाहेबांचे पूर्वज हे महाराजांच्या काळात धर्मजागराचे काम करीत होते. तेव्हापासून धर्माधिकारी हे बिरुद लागले. इतक्या पिढ्या हे काम सुरू आहे. अंधश्रद्धा निर्मुलन, व्यसनमुक्ती, वृक्षारोपणाच्या कार्यामुळे मोठे परिवर्तन झाले. 25 लाखांपेक्षा जास्त वृक्ष श्री सदस्यांनी लावलेत. पाच जंगलांचे व्यवस्थापन करतायेत. जल व्यवस्थापनाचे काम करीत आहेत. मोठ्या प्रमाणात गाळ काढण्याचे काम केले. 13 जिल्ह्यात जल पुनर्भरणाचे काम, रक्तदान शिबिरे देशासह इतर अनेक देशांतही केली आहेत. स्वच्छतेसाठी मोठे काम केले आहे. गरिबांना शैक्षणिक साहित्य वाटपाचे कामही मोठे आहे. पश्चिमी विचार जगाला बाजार समजतो. भारतीय विचार हा जगाला बाजार समजत नाही, परिवार समजतो. हाच विचार आप्पासाहेबांनी सातत्याने मांडला. कोट्यवधी लोक समाजसुधारणेचे काम करतायेत. दासबोधाचे निरुपण करताना मनात संस्कारांचे रोपण केले आहे. आप्पासाहेब यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा देतो, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

निरुपणाचा भक्तीसागर पाहून धन्य झालो -ना. मुनगंटीवार

आज आप्पासाहेबांच्या हा निरुणपणाचा भक्तीसागर मला पहायला मिळाला… धन्य झालो मी! धन्य झाला महाराष्ट्र भूषण पुरस्कार… महाराष्ट्र शासन! अध्यात्म, सामाजिक प्रबोधन, अंधश्रद्धा निर्मुलन यासाठी आप्पासाहेबांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला. आप्पासाहेबांच्या निरुपणाचा भक्तीसागर पाहण्याचा योग आज आला. आप्पासाहेब धर्माधिकारी नावाचा जगातील सर्वात मोठा चुंबक आज या व्यासपीठावर आहे. निरुपणाच्या माध्यमातून जसे आप्पास्वारी मन स्वच्छ करतात तसं ते परिसरही स्वच्छ ठेवतात. झाडे लावून पर्यावरणसुद्धा वनयुक्त करता तेव्हा असे कोटीकोटी पुरस्कार दिले तरी त्यांचा गौरव शब्दांने होऊ शकणार नाही. हाताला सेवेचे काम देऊन भविष्य घडविणार्‍या आप्पासाहेबांना सांस्कृतिक कार्य विभागाचा पुरस्कार देताना प्रचंड स्फूर्ती प्राप्त होत आहे.

अखेरच्या श्वासापर्यंत समाजप्रबोधन करीत राहणार-डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी

हा माझ्या आयुष्यातल्या भाग्याचा क्षण आहे. कुठलाही पुरस्कार मोठाच असतो. हा माझा नाही तर कार्याचा गौरव आहे. नानासाहेबांनी जे कष्ट केले, श्री सदस्यांनी जे कष्ट केले, करतायेत, त्यांना याचे श्रेय जाते. महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देणे, एका घरात दुसर्‍यांदा देणे हे पहिल्यांदाच होतेय. हे महान कौतुक आहे असे कृतज्ञतापूर्ण उद्गार आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी काढले.खेड्यांतून हे काम सुरू केले. त्यामुळे या कामाची प्रसिद्धी कधी केली नाही. प्रसिद्धीमुळे काही मिळत नाही. मानवता हा सगळ्यात महत्त्वाचा धर्म आहे. त्यासाठीच हा सगळा खटाटोप आहे. अखेरच्या श्वासापर्यंत नानासाहेबांप्रमाणेच काम करेन. सचिनही उत्तराधिकारी म्हणून काम करीत राहणार आहे. काम जेव्हा उत्तम होते, तेव्हा कौतुक होते. कार्य श्रेष्ठ आहे म्हणून देहाचा सन्मान होतो. हा पुरस्कार मी नानांना आणि तुम्हाला अर्पण करतो. समाजाचे, देशाचे ऋण आपल्यावर आहेत. आई-वडिलांचे ऋण आपल्यावर आहेत. त्यांच्यासाठी आपण काय करतो, हा प्रश्न आहे. प्रत्येकाने उभे राहून सेवा करायला हवी. केवळ बोलून होत नाही. समाजसेवा ही सगळ्यात श्रेष्ठ सेवा आहे. प्रतिष्ठान विविध काम करते. वृक्षारोपणाने आयुष्य आनंदाने जगण्याची ऊर्जा मिळते. त्यासाठी रोपण केले पाहिजे. वृक्ष लावणे सोपे आहे, पावसाळ्यात प्रत्येकाने पाच झाडे लावावीत. लहान मुलांप्रमाणे वृक्षांची जोपासना करावी. वृक्षांचे मोठे कार्य आहे. देशात सगळ्यांनी आनंदी जगावे यासाठी आरोग्य शिबिर घेतो. त्यात अनेकांना मार्गदर्शन करतो. त्यासाठी प्रयत्न करतोय आणि यापुढेही करीत राहणार. आपण प्रसिद्धीपासून लांबच राहतो, प्रसिद्धीमधून काहीही साध्य होत नाही. महत्त्वाच्या गोष्टीची जाहिरात करायची गरज काय? पण जाहिरात करणार्‍यांसंदर्भात माझा राग नाही. मानवता धर्म श्रेष्ठ आहे. तो प्रत्येकाच्या मनात रुजू व्हायला हवा. त्यासाठीच आमचा हा खटाटोप आहे. नानासाहेबांनी 87 वर्षांपर्यंत काम केले आहे. आता माझा जीवात जीव असेपर्यंत, श्वास सुरू असेपर्यंत हे काम मी चालू ठेवणार आहे, असे डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी या वेळी म्हणाले.

पुरस्काराची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सुपूर्द

कोकण विभागासह राज्यातील विविध भागातून आलेल्या सुमारे 20 लाखांहून अधिक श्रीसदस्यांच्या साक्षीने डॉ. आप्पासाहेबांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मानपत्र, सन्मानचिन्ह व 25 लाखांचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी पुरस्काराची 25 लाख रुपयांची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सुपूर्द केली.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply