Breaking News

मुलखावेगळा लोकनेता

राजकारणाचा स्तर सध्या कुठल्या दिशेने जात आहे हे आपण सारे रोजच पाहात-ऐकत असतो. एकमेकांच्या चारित्र्यावर चिखलफेक करण्याची चढाओढ लागलेल्या आजच्या काळामध्ये शिवराळ नेतेच प्रसिद्धीच्या झोतात दिसतात. राजकारणामध्ये आपण नेमके कशासाठी आलो आहोत याचा जणू या तथाकथित नेत्यांना विसरच पडला आहे. अशा परिस्थितीत लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे वेगळेपण झगझगीतपणे उठून दिसते. आसपासच्या राजकारणाच्या चिखलफेकीत जरासुद्धा लक्ष न घालता लोकसेवेचे त्यांनी घेतलेले व्रत अखंड सुरू आहे, तेदेखील वयाच्या 72व्या वर्षी.

रायगड जिल्ह्यातील व विशेषत: पनवेल परिसरातील जनतेच्या वाट्याला असा मुलखावेगळा नेता आला हे त्यांचे भाग्यच म्हणायला हवे. एकंदरच जगणे आज इतके आत्मकेंद्री होत चालले आहे की, अडीअडचणीच्या प्रसंगी, संकटकाळी आपण कुणाला हाक देऊ शकू याचा संभ्रमच प्रत्येकाला पडावा, परंतु अशाच काळात लोकनेते रामशेठ आजही आपली आधारवडाची प्रतिमा टिकवून आहेत. मदतीसाठी त्यांच्यासमोर उभी राहिलेली कुणीही व्यक्ती आजही विन्मुख होऊन परतत नाही आणि यातील सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे रामशेठ आजही कुठलीही मदत दातृत्वाचा अभिनिवेश आणून करीत नाहीत, तर आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेनेच त्यांची लोकसेवा अविरत सुरू असते. वैयक्तिक आयुष्यात प्रारंभी त्यांनी खडतर दिवस अनुभवले आहेत. त्यामुळे दीनदुबळ्या गरजूंविषयी त्यांना कणव वाटत असावी, असे म्हणावे तर त्यांच्यासारख्याच खडतर परिस्थितीतून पुढे येऊन प्रतिष्ठा प्राप्त करणारे, उद्योगधंदे उभारणारे कितीतरी नेते आपल्या अवती-भवती आहेत, परंतु असे ‘देणारे हात’ त्यांना लाभलेले दिसत नाहीत. मुळात श्रम, शिक्षण आणि संस्कार या मुशीतून रामशेठ यांचे हे आगळे व्यक्तिमत्त्व साकारले आहे, असे जे नेहमी म्हटले जाते ते खरेच आहे. कर्मवीर भाऊराव पाटील नावाच्या वटवृक्षाच्या छायेत ज्या काळात महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांतील असंख्य गोरगरीब मुलांना आसरा मिळाला तो काळ, तो अनुभव रामशेठ यांच्या व्यक्तिमत्त्वावर चिरंतन संस्कार करून गेला. स्वत: रामशेठ यांची माध्यमिक शिक्षणापर्यंतची वाटचाल अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतच झाली, परंतु तो भूतकाळ मागे टाकून रामशेठनी मनोमन जपला तो रयत शिक्षण संस्थेचा संस्कार. सातार्‍यातील छत्रपती शिवाजी महाविद्यालयामध्ये कमवा व शिका या योजनेंतर्गत स्वत: रामशेठ यांना आयुष्याला आकार देणारा मार्ग सापडला व त्यातूनच तरुण वयातच रामशेठ यांच्या मनात समाजसेवेचे बीज रुजले. आपल्याला जसा आधार मिळाला, मार्ग सापडला तसाच आपल्या रायगड जिल्ह्यातील गोरगरिब बांधवांना आणि भगिनींना उद्धाराचा मार्ग दाखवायचा असा निश्चय करून अगदी नि:स्वार्थ भावनेने त्यांनी रायगड जिल्ह्यात किती प्रचंड मोठे समाजकार्य उभे केले, ते इथला अवघा समाज जाणतोच. त्यातही अर्थातच शिक्षण क्षेत्राविषयी त्यांना अधिक जवळीक वाटत राहिली आहे आणि म्हणूनच ते सदोदित गोरगरीब आणि गरजू विद्यार्थ्यांच्या पाठीशी सहजपणे उभे राहिले आहेत. त्यांच्या प्रेरणेतून सुरू झालेला विद्यादानाचा यज्ञ आजही अव्याहत सुरू आहेच. रामशेठ यांच्या प्रयासातून उभ्या राहिलेल्या तब्बल 20 शिक्षणसंस्था आज हजारो विद्यार्थ्यांकरिता आधुनिक शिक्षणाच्या अनेक वाटा खुल्या करून देत आहेत. अर्थात, शिक्षणावर लक्ष केंद्रित केले असले तरी त्यांनी जनसामान्यांच्या अन्य समस्यांकडे दुर्लक्ष केले असा त्याचा अर्थ मुळीच होत नाही. त्यांच्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे निरनिराळ्या संकटकाळात गरजूंना सर्व प्रकारची मदत पुरवली जातेच. रामशेठ यांनी आजवर किती कुटुंबांना जगण्यासाठी आधार दिला असेल याची गणतीच करता येणार नाही. गेली कित्येक वर्षे रायगड जिल्ह्यातील जनता या आधारवडाची सावली अनुभवते आहे आणि कोरोना महासाथीसारख्या भीषण संकटाच्या काळात तर त्यांनी जराही गाजावाजा न करता असंख्य दीनदुबळ्यांचे जगणे सावरून धरले. त्यांचा पिंडच मुळात एका कर्मयोगी समाजसेवकाचा असल्याने त्याच भावनेने आजही ते आपले हे सेवाव्रत अव्याहतपणे पार पाडीत आहेत. या सेवाभावी कामांचे त्यांच्या राजकीय कारकीर्दीशी देणेघेणे कधीही नव्हतेच. राजकारणाकडे ते कायमच एका अलिप्त वृत्तीने पाहात आले आणि म्हणूनच वयाच्या अवघ्या 54व्या वर्षी ते पुन्हा निवडणूक लढवायची नाही असा निर्धार करू शकले. मागील दारांनी प्रवेश करून कसाबसा राजकारणात तग धरणारे आणि निव्वळ वैयक्तिक लौकिक यशावरच नजर असलेले कित्येक नेते अवतीभवती आहेत, परंतु रामशेठ यांच्याकरिता असे लौकिक यश वाटचालीच्या केंद्रस्थानी कधी नव्हतेच. त्यांच्या सेवाभावी वृत्तीतून ते आपसूकच त्यांच्या दिशेने येत गेले हे भाग अलाहिदा. त्यांच्या कामातून त्यांनी रायगड जिल्ह्यातील जनतेचे अलोट प्रेम कमावले आणि अस्सल लोकनेते पदही. बाकी कमावलेले सारे काही ‘इदं न मम’ या वृत्तीने ते लोकांमध्येच वाटत राहिले आहेत. अशा या विलक्षण सेवाभावी वृत्तीच्या लोकनेत्याला 71व्या वाढदिवसाच्या आणि यापुढील आरोग्यदायी वाटचालीसाठीच्या अनेकोत्तम शुभेच्छा!

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply