कर्जत : प्रतिनिधी
सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाच्या अनुषंगाने जीवनविद्या मिशन शाखा नवी मुंबई नंबर एकने कार्यासाठी घेतलेल्या पाच तालुक्यांपैकी एक तालुका म्हणजे कर्जत होय. या कर्जत तालुक्यातील कार्याचे पहिले पुष्प जीवनविद्या मिशन कर्जत ज्ञानपीठाहुन जवळच असलेल्या वदप या गावी गुंफण्यात आले. जीवनविद्या मिशन प्रणित सामुदायिक उपासनायज्ञाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. गावातीलच 97 वर्षाचे ज्येष्ठ नागरिक विठ्ठल शिंदे यांनी सद्गुरूंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. श्रीकुमार मराठे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. श्री सद्गुरूंचे शिष्य प्रवचनकार, कीर्तनकार भरत पांगारे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि जीवनविद्या काळाची गरज असा दमदार विषय घेऊन उपस्थित सर्व ग्रामस्थांना मंत्रमुग्ध केले. बालसंस्कार, राष्ट्रभक्ती राष्ट्रनिष्ठा या विषयांवर विचार व्यक्त करण्यात आले. तसेच राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवरायांवर केलेले संस्कार या विषयी पोवाडे, ओव्या, अभंगाच्या साथीने उपस्थितांची मने जिंकण्यात आली. प्रबोधनातून सद्गुरूंची आणि जीवन विद्या मिशनच्या ज्ञानपीठाची माहिती देऊन सर्वाना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमांमध्ये मृदुंगाची साथ हभप शंकर महाराज गणगे आणि केतन लागवणकर यांनी दिली. हार्मोनियमची साथ सुनील सावंत यांनी केली. कार्यक्रमाचे निवेदन युवा नामधारक अभिजीत कोदे आणि विठ्ठल गोळे यांनी केले. कार्यक्रमाला जीवनविद्या मिशन नवी मुंबई शाखेच्या अध्यक्षा वंदना पठाडे, सचिव मंगेश वालकर, खजिनदार विजय नलावडे, जीडीसी बापूसाहेब इंचानाळकर, शाखेचे अनुभवी पदाधिकारी जोगदंड व गावडे उपस्थित होते. कर्जत तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती मनोहर थोरवे यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यांसाठी जीवनविद्या मिशनचे अनुभवी ट्रस्टी संतोष सावंत, पुण्याहुन विश्वास देशपांडे उपस्थित होते. नवी मुंबई शाखा क्रं.1 मधून एकूण 18 युवा नामधारक उपस्थित होते. वदप गावातील हनुमान मंदिराच्या वर्धापन सोहळ्यासाठी आयोजित या कार्यक्रमास सर्व महिलावर्ग, पुरुष व ज्येष्ठ ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी वकील अमित पाटील यांनी आभार व्यक्त केले. दरम्यान, सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाच्या अनुषंगाने विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.