Breaking News

मार्क मोबिस भारताविषयी इतके आशावादी का आहेत?

पन्नास अब्ज डॉलरचे व्यवस्थापन करणारे अमेरिकेतील मोबिस कॅपिटल पार्टनरचे फंड मॅनेजर मार्क मोबिस भारताच्या अर्थव्यवस्थेविषयी एवढे आशावादी का आहेत? त्याची काही कारणेच त्यांनी अलीकडे एका मुलाखतीत सांगितली. काय आहेत ती कारणे आणि भारतीय नागरिक त्यांच्याशी सहमत होतील का?

रशियाने युक्रेनवर केलेला हल्ला आणि तैवानवर ताबा मिळविण्याच्या चीनच्या मनसुब्यामुळे जगात सध्या राजकीय आणि आर्थिक अस्थिरता वाढली आहे. तिकडे युक्रेनला बहुतांश युरोपीय देश आणि अमेरिकेचा तर इकडेही तैवानला अमेरिकेचा पाठिंबा आहे. भारत आणि चीनमधील सीमावाद जर जुनाच असून त्यावरून भारताच्या सीमेवर पुन्हा तणाव निर्माण होऊ लागला आहे. जेव्हा अमेरिका युक्रेनला पाठिंबा देते, तेव्हा रशिया आणि चीन जवळ येतात तसेच अमेरिका तैवानचा बचाव करते, तेव्हाही हे दोन्ही देश एकत्र येताना दिसतात. चीनच्या विस्तारवादावर रशिया प्रतिक्रिया देत नाही आणि चीनने पाकिस्तानसारख्या देशांना मदत केली, ते देशही चीन विरोधी भूमिका घेऊ शकत नाहीत. युरोपमध्ये चीनची विश्वासार्हता कमी होते आहे तर ऑस्ट्रेलियासारखे देश थेट चीनच्या विरोधात उभे रहाताना दिसत आहेत. याचा अर्थ असा की ‘जगाची फॅक्टरी’ म्हणविणार्‍या चीनच्या विरोधात जाणार्‍या देशांची संख्या वाढत चालली आहे. म्हणजे चीनशी त्या देशांचा असलेला व्यापार आगामी काळात कमी होण्याची शक्यता आहे. तो कमी झाला तर ती उणीव भरून काढण्याची क्षमता असलेला एकच देश समोर येतो, तो म्हणजे भारत!

चीनची उणीव भरून काढणारा देश

भारताची उत्पादन क्षमता आज चीन इतकी प्रचंड नसली तरी भारतीय उद्योगांनी अलीकडे घेतलेली झेप आणि भारताची तरुण लोकसंख्या ही चीनची उणीव भरून काढू शकते. जगात अस्थिरता माजून भारताचा फायदा व्हावा, अशी अपेक्षा करणे, योग्य नाही. पण आजची परिस्थितीच तशी तयार झाली आहे. त्यामुळे जगात टोकाची युद्धखोरी वाढली नाहीतर जगातील बदलत्या परिस्थितीचा भारत लाभधारक आहे, एवढे नक्की! आजच्या या परिस्थितीकडे केवळ आर्थिक अंगाने पाहिले तर भारताचा आर्थिक फायदा होताना दिसतो आहे. त्यामुळे जगाचे लक्ष पुन्हा भारताकडे लागले तर आश्चर्य वाटण्याचे काही कारण नाही. अमेरिकेतील मोबिस कॅपिटल पार्टनरचे फंड मॅनेजर मार्क मोबिस यांनी अलीकडे एका मुलाखतीत भारताच्या या सर्व क्षमतांचा आवर्जून उल्लेख केला आहे. तब्बल 50 अब्ज डॉलरचे व्यवस्थापन करणारे मार्क यांच्या मताला जगात महत्व आहे. भारताची अर्थव्यवस्था आज कशी आहे, याविषयी भारतात अनेक टोकाची मते पाहायला मिळतात. या पार्श्वभूमीवर अमेरिकन गुंतवणूक तज्ञाला भारताविषयी काय वाटते, हे जाणून घेतले पाहिजे आणि त्यातील काही भारतात खरोखरच दिसते का, याचाही विचार केला पाहिजे.

मोबिस भारताकडे कसे पाहतात?

आधी मार्क मोबिस यांनी भारताविषयी काय म्हटले, ते पाहू. त्यातील महत्त्वाचे काही मुद्दे असे -1. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे आयएमएफने भारताचा विकासदर ही दोन वर्षे जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सर्वाधिक असेल, असे म्हटले आहे. कारण भारतामध्ये महामार्ग, रेल्वेमार्ग आणि इतरपायाभूत सुविधांची प्रचंड कामे सध्या सुरु आहेत. 2. नळाने पाणी पुरवठा असणारी घरे आणि गॅसचा वाढत चाललेला वापरही जीवनमान सुधारत असल्याची लक्षणे आहेत. 3. डिजिटल व्यवहार आणि बँकिंगमुळे आर्थिक समावेशन वेगाने वाढत असून त्याला मोबाईल फोन आणि इंटरनेटनेटने गती दिली आहे. 4. डिजिटलायझेशनचा फायदा जनता, सरकारला तर होतो आहेच, पण जेव्हा रुपयाची घसरण रोखण्याची वेळ आली तेव्हा भारतीय रिझर्व बँकेलाही त्याचा चांगलाच फायदा झाला आहे. त्यामुळेच रुपयाची घसरण इतर देशांच्या तुलनेने आवाक्यात आहेत. 5. जगातील नकारात्मक वातावरणामुळे गेले वर्षभर परकीय गुंतवणूकदार भारतातील गुंतवणूक काढून घेत असले तरी याच काळात भारताची निर्यात विक्रमी वाढली आहे.चीनला पर्याय म्हणून जग भारताकडे पाहत असल्याची ही सुरवात आहे. शिवाय भारताची माहिती तंत्रज्ञानातील निर्यात पूर्वीसारखीच कायम टिकून आहे. 6. भारतातील वैविध्य तसेच बदलत्या आर्थिक साखळ्यांमुळे वस्तूंची मागणी कायम रहाते. जेथे वैविध्य नाही, अशा देशांना हा फायदा मिळत नाही. 7. मध्य उत्पन्न गटातील कुटुंबांचे प्रमाण भारतात सातत्याने वाढत आहे. त्यामुळे त्यांचा खाण्यापिण्यावरील खर्च वाढत चालला आहे. आरोग्य, शिक्षण आणि मनोरंजनावरील खर्च तर त्यापेक्षाही वेगाने वाढतो आहे. 8. अपुरी वीज, वाहतुकीच्या सोयींचा अभाव आणि आर्थिक समावेशनाअभावी ग्रामीण भारतातील ग्राहकशक्तीचा अर्थकारणात वाटा इतकी वर्षे कमी पडत होता, पण आता वीज, वाहतूक आणि बँकिंगमधील वाढीमुळे त्यांची ग्राहकशक्ती वाढली आहे. तसेच इंटरनेटमुळे त्यांना मिळत असलेली माहिती शहरी ग्राहकाच्या बरोबरीची होऊ लागली आहे. 9. भारत हा मोठा ग्राहक असलेला देश आहे, त्यामुळे भारतातील काही कंपन्यांचा विस्तार वेगाने होत असून त्यातील काही कंपन्यांची जगात ओळख होऊ लागली आहे. त्या अर्थातच लिस्टेड कंपन्या आहेत. त्यामुळे भारतीय भांडवली बाजारात इतर देशातील गुंतवणूकदारांना रस निर्माण होऊ लागला आहे. 10. अनिवासी भारतीयांची संख्या मोठी आहे तसेच ते उच्च मध्यमवर्गीय गटातील आहेत. त्यांना भारतात गुंतवणुकीसाठी सरकारकडून प्रोत्साहन मिळत असल्याने रिमिटन्स सातत्याने वाढतो आहे. भांडवली बाजाराचे संपूर्ण डिजिटलायझेशन आणि त्यामुळे वाढलेला विश्वास हेही त्याचे एक कारण आहे.

आजची भारतीय अर्थव्यवस्था

ज्या गोष्टी कोणाही जागरूक भारतीय नागरिकाला माहीत आहेत, त्याच गोष्टी मार्क मोबिस यांनी सांगितल्या आहेत, हे यावरून आपल्या लक्षात येईल. मात्र अमेरिकेतल्या एका मोठ्या गुंतवणूकदाराला भारताविषयी काय वाटते, याला महत्व आहेच. भारताची भूमिका आणि आर्थिक विकास याला जगाच्या व्यासपीठावर अधिक महत्व प्राप्त होईल, असेही त्यांनी म्हटले आहे. प्रत्यक्षात ती लक्षणे भारतीय अर्थव्यवस्थेत दिसू लागली आहेत. युद्धजन्य परिस्थितीमुळे जगभर महागाई वाढल्याने आणि त्याचे परिणाम भारतातही होणे अपरिहार्य असल्याने महागाईचा मुद्दा थोडा बाजूला ठेवून आज भारतीय अर्थव्यवस्थेकडे पाहिल्यास त्याची प्रचीती येते. कोरोनाच्या धक्क्यातून वेगाने बाहेर येत असलेली अर्थव्यवस्था, भारताच्या परकीय चलनाच्या साठ्यात पुन्हा होत असलेली वाढ, शेअर बाजारातील कंपन्यांचे वाढीव नफ्याचे आकडे, रुपयाची रोखली गेलेली घसरण, सरकारच्या तिजोरीत कररूपाने चांगला निधी जमा होत असल्याने वाढलेला भांडवली खर्च, संरक्षणासह अनेक क्षेत्रात निर्यातीला आलेला वेग, अन्नधान्याची, फळांची आणि भाज्यांची मुबलकता, हवाई क्षेत्राचा वेगाने होत असलेला विस्तार तसेच मोटारी आणि ट्रॅक्टरच्या विक्रीचे वाढीव आकडे.. ही सर्व आकडेवारी पुरेशी बोलकी आहे.

-यमाजी मालकर, अर्थप्रहर

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply