Breaking News

कणखर ‘नया भारत’

काही दिवसांपूर्वी भाजपच्या प्रवक्त्या नूपुर शर्मा आणि नवीनकुमार जिंदाल यांनी मोहंमद पैगंबरांविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. त्याबद्दल भाजपने तातडीने त्यांची हकालपट्टी केली असली तरी गदारोळ उडाला. हा गदारोळ देशात तर उडालाच परंतु त्याचे पडसाद आंतरराष्ट्रीय पातळीवरही उमटले. इस्लामिक सहकार्य संघटना (ओआयसी), सौदी अरेबिया, अफगाणिस्तान, बहारिन आदी देशांनी भारतावर टीका केली. अर्थात यात पाकिस्तान देखील मागे राहणे शक्य नव्हते. या टीकेला भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने झणझणीत प्रत्युत्तर दिले आहे.

अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या मताला काहीच किंमत दिली जात नव्हती. विशेषत: युरोपीय देश आणि अन्य आर्थिकदृष्ट्या संपन्न देशांना भारताने व्यक्त केलेली मते आणि अपेक्षांची काही पर्वा नव्हती. कोणीही यावे, टपली मारोनी जावे अशीच भारताची अवस्था असे. आता मात्र परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. आंतरराष्ट्रीय देशांच्या समुदायात भारताकडे अपेक्षेने पाहण्याची वृत्ती निर्माण होताना दिसते. सदोदित पड खाणारा हाच का तो भारत देश, असे एखाद्या पुढारलेल्या देशाच्या नेत्याला वाटले तर त्यात आश्चर्य नाही. गलवान खोर्‍यामध्ये आगळीक करणार्‍या चीनला भारतीय मुत्सदेगिरीने आंतरराष्ट्रीय पातळीवर एकटे पाडले हे नजीकच्या काळातले यशच म्हणावे लागेल. या न त्या कारणाने शेजारी असलेल्या पाकिस्तानचा भारताविरुद्ध थयथयाट सुरू असतोच. परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा आता चांगलाच दबदबा निर्माण झाल्यामुळे पाकिस्तानच्या थयथयाटाला कोणी दमडीची किंमत देत नाही. सुमारे आठवड्याभरापूर्वी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी युरोपीय देशांमध्ये जाऊन त्यांना खडे बोल सुनावले होते. युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर जयशंकर यांनी युरोपियन देशांचा दुटप्पीपणा वेळोवेळी उघडा पाडला. आताही कथित वादग्रस्त टिप्पणीवरील इस्लामिक देशांच्या प्रतिक्रियांना भारताने चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारत सरकार सर्व धर्मांप्रती सर्वोच्च आदरभाव बाळगते. परंतु हिंदु, शीख आणि ख्रिश्चनांसह सर्व अल्पसंख्याकांचे पद्धतशीर शोषण करणार्‍या पाकिस्तानात कट्टरपंथीयांची स्मारके उभारली जातात. इस्लाम धर्मीय देशांनी याकडे अधिक लक्ष केंद्रित करावे असा सल्ला भारताने टीका करणार्‍या देशांना दिला आहे. इस्लामिक देशांच्या संघटनेने केलेली टीका ही त्यांचा विभाजनकारी अजेंडा उघड करते. त्यांनी जातीय दृष्टिकोन दूर सारून भारताप्रमाणे सर्व धर्मांविषयी उचित सन्मान दाखवावा असा आम्ही त्यांना आग्रह करू अशी मल्लिनाथी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अरिंदम बागची यांनी केली. कुण्या प्रवक्त्याने किंवा सामान्य नागरिकाने व्यक्त केलेली मते ही कधीही देशाच्या धोरणाचा भाग होऊ शकत नाहीत. देशाचे परराष्ट्र धोरण एका विशिष्ट दिशेनेच पुढे सरकत असते. सरकार बदलले म्हणून त्यात फारसा फरक होताना दिसत नाही. मोदी सरकार केंद्रामध्ये आले, तेव्हापासून एक फरक मात्र पडला. तो म्हणजे भारतीय परराष्ट्र खाते अधिक आक्रमकपणे काम करू लागले. हा आत्मविश्वास कुठून आला याचा विचार अन्य देशांनी नाही तर किमान काँग्रेससारख्या विरोधीपक्षांनी तरी करायला हवा. काँग्रेसच्या राजवटीत इस्पिकला इस्पिक आणि किल्वरला किल्वर म्हणणारे सरकार जागेवर तरी होते काय? पंतप्रधान मोदींच्या स्वप्नातला हाच खरा ‘नया भारत’ आहे. या एकंदरीत प्रकरणात पराचा कावळा करण्यात आला हे तर उघड दिसतेच. सुदैवाने असल्या छोट्या वादळांना समर्थपणे तोंड देणारे नेतृत्व राजधानी दिल्लीत सतर्कपणे काम करत आहे.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply