Breaking News

सुक्या मासळीचे दर भिडले गगनाला

दासगावचा मासळी बाजार सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर

महाड : प्रतिनिधी : तालुक्यातील दासगाव येथे भरणार्‍या मासळी बाजाराला गेल्या अनेक वर्षाची परंपरा आहे. यामुळे या परिसरात हा बाजार प्रसिद्ध आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या बाजारातील सुक्या मासळीचे दर गगनाला भिडले असल्याने सर्वसामान्य ग्राहकांसह घावूक व्यापारीदेखील हबकले आहेत.

महाड तालुक्यातील दासगावमधील आठवडी बाजार हा फक्त सुक्या मासळीसाठी प्रसिद्ध आहे. ब्रिटीशकाळात याठिकाणी बंदर होते. होडीच्या सहाय्याने याठिकाणी सुकी मासळी आणि इतर मालाची ने -आण होत होती. दासगाव पंचक्रोशीसह महाड खाडीपट्टा ते थेट भोर परिसरातील ग्राहकांची याठिकाणी सुकी मासळी नेण्यासाठी गर्दी असते. दासगाव बाजारात दिघी, म्हसळा, श्रीवर्धन आदी ठिकाणाहून सुकी मासळी येते. चांगल्या दर्जाची आणि खिशाला परवडेल अशा दराने सुकी मासळी मिळत असल्याने दासगाव बाजारात आजदेखील कायम गर्दी असते. मात्र गेल्या काही वर्षापासून येथील सुक्या मासळीचे दर चढत गेले आहेत. सध्या तर हे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर गेले आहेत. घावूक व्यापार्‍यांची मागणी वाढल्याने आणि सुक्या मासळीची आवक कमी झाल्याने हे दर वाढले आहेत. दासगावमध्ये सध्या हे दर किलोला किमान पाचशेच्या वर आहेत. त्यातच आता पावसाळी खरेदी सुरु झाली असल्याने हे दर कायम आहेत. गेली दोन आठवडे तरी हे दर कायम असल्याने सर्वसामान्य ग्राहक हवालदिल झाला आहे.

दासगावमधील आठवडी बाजारात सोडे आजही चक्क 1800 रुपये, सुके बोंबील 600 रुपये, अंबाडी सुकट 700 रुपये प्रतिकिलो दराने विकले जातात. कोलीम, वाकटी, मासे सुकट, आदींचे दरदेखील पूर्वीपेक्षा दुप्पट झाले आहेत. यामुळे ग्राहक नाराज होवून सुकी मासळी खरेदीकडे पाठ फिरवत आहेत. या बाजारावर आता घावूक व्यापार्‍यांची नजर असल्याने ते याठिकाणी मोठ्या प्रमाणात सुकी मासळी खरेदी करतात. आपला माल एकाच वेळेस संपत असल्याने विक्रेतेदेखील सर्वसामन्य ग्राहकांकडे फारसे लक्ष देत नाहीत.

 या बाजाराला ऐतिहासिक महत्व असले तरी ज्या दासगावमध्ये हा बाजार भरतो तेथे या सुकी मासळी विक्रेत्यांना आणि ग्राहकांना सोयी-सुविधांचा अभाव आहे. दासगाव ग्रामपंचायत या व्यापार्‍यांकडून फक्त 20 रुपये कर वसुल करते तर कृषी उत्पन्न बाजार समिती 40 टक्के कर वसुली करत आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply