अलिबाग : जिमाका, प्रतिनिधी : रायगड जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचार्यांसाठी सोमवार (दि. 6)पासून 8 मेपर्यंत विशेष वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, त्याचे उद्घाटन सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश देवऋषी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी निखिलकुमार ओसवाल, यांची उपस्थिती होती.
खोपोली येथील माधवबाग संस्थेतर्फे जिल्हा परिषद कार्यालयाच्या चौथ्या मजल्यावर घेण्यात आलेल्या या शिबिरात कर्मचार्यांची हृदयरोग, मधुमेह यासंदर्भातील चिकित्सा आणि तपासणी करून त्यांना पुढील उपचारांचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी डॉ. अमन कपूर यांनी दिली. चांगल्या आरोग्यासाठी केवळ आहार-विहारच नव्हे तर आचार-विचारदेखील तितकेच महत्वाचे आहे. सुदृढ शरीरासाठी सुदृढ मन आवश्यक आहे, त्यामुळे सकारात्मक विचारसरणी ठेवून आणि हसतमुखाने काम करा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांनी यावेळी केले. उपचार करीत बसण्यापेक्षा आजाराला आणि रोगांना मुळात प्रतिबंध घालणे आवश्यक आहे, असे सांगून प्रकाश देवऋषी यांनी योगाचे महत्व विषद केले. या शिबिरात रक्त, मुत्र तपासणी, स्ट्रेस टेस्ट, रक्तदाब, मधुमेह यावर वैद्यकीय सल्ला देण्यात येणार आहे. तसेच विशेषत: हृदयाशी संबंधित आवश्यक चाचण्याही करण्यात येणार आहेत.