कर्जत : बातमीदार
माथेरानमधील घोड्यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी रायगड जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात व्हेटरिनरी प्रॅक्टिशनर्स वेल्फेअर असोसिएशन या संस्थेने सहभाग घेतला होता. पशुसंवर्धन विभागाच्या माथेरानमधील दवाखान्यात परवाना पूर्व घोड्यांसाठी शुक्रवार आणि शनिवार महाआरोग्य शिबिर घेण्यात आले. येथील पशुधन विकास अधिकारी अमोल कांबळे तसेच व्हेटरिनरी प्रॅक्टिशनर्स वेल्फेअर असोसिएशनचे डॉ. रोहित गायकवाड, डॉ. राजेंद्र मरगज, डॉ. गुरुप्रसाद महाडिक, डॉ. दिलीप चौधरी आणि डॉ. प्रशांत बिराजदार यांनी माथेरानमधील घोड्यांची तपासणी केली. दोन दिवस चाललेल्या शिबिरात एकूण 460 घोड्यांची तपासणी करण्यात आली. माथेरान पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक शेखर लव्हे यांनी या शिबिराला भेट दिली.