नवी दिल्ली : वृत्तसंस्था
सध्या जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. भारतातही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे एक दिलासादायक बाब समोर आली आहे. देशातील कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचा दर वाढला आहे. भारतातील रुग्ण बरे होण्याचा दर हा आता अमेरिकेपेक्षाही अधिक झाला असून, भारत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात शनिवारी (दि. 19) सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये देशातील 95 हजार 885 जण कोरोनामुक्त झाले आहे, तर दुसरीकडे 93 हजार 337 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. ही संख्या कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांपेक्षा कमी आहे.
देशातील कोरोनाबाधितांच्या एकूण संख्येने 53 लाखांचा टप्पा पार केला आहे. यापैकी 42 लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. अमेरिकेपाठोपाठ कोरोनाचा सर्वाधिक फटका भारताला बसला आहे. जगभरातील एकूण कोरोनाबाधितांपैकी 17 टक्के रुग्ण हे भारतात आहेत. देशातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही 19.10 टक्के इतकी आहे. देशातील कोरोनामुळे होणारा मृत्यूदर हा 1.61 टक्के, तर सकारात्मकता दर 10.58 टक्के इतका असल्याची माहिती समोर आली आहे.
केंद्र सरकारला श्रेय
देशातील रुग्ण बरे होण्याचा दर म्हणजेच रिकव्हरी रेट हा 79.28 टक्क्यांवर पोहोचला आहे. आरोग्य मंत्रालयाने याचे श्रेय केंद्र सरकारला देत रणनीती, ठोस उपाययोजनांसाठी चाचण्या, सुरुवातीच्या टप्प्यात रुग्णांची ओळख, ट्रॅकिंग आणि देखरेखीसाठी उचललेली पावले यामुळे हे शक्य झाल्याचे म्हटले आहे.
Check Also
टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीग उत्साहात
माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस वितरण पनवेल ः रामप्रहर वृत्तरोटरी प्रांत 3131मधील …