Breaking News

उमटे धरणावर अवलंबून असणार्या गावांना टँकरने पाणीपुरवठा करा

भाजपची अलिबाग प्रांताधिकार्‍यांकडे मागणी

अलिबाग, रेवदंडा : प्रतिनिधी

तालुक्यातील उमटे धरणावर अवलंबून असणार्‍या 65 गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी अलिबाग येथील उपविभागीय अधिकार्‍यांकडे केली आहे. या वेळी प्रांताधिकार्‍यांना उमटे धरणातील दूषित पाण्याने भरलेली बाटली देण्यात आली.

उमटे धरणाबाबत भारतीय जनता पक्षाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांच्या नेतृखाली भाजप शिष्टमंडळाने अलिबाग उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे यांची भेट घेऊन त्यांचाशी चर्चा केली. त्यानंतर त्यांना निवेदन देण्यात आले. या वेळी जगदीश घरत, अतिश गायकवाड, अजिंक्य पाटील, जगन शेळके, रमेश ढवूशे, सुदाम झावरे आदी उपस्थित होते.

उमटे धरण हे रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येते. उमटे धरणाच्या पाण्यावर धरणालगतची 65 गावे अवलंबून आहेत. अलिबाग तालुक्यातील रामराज ग्रामपंचायत हद्दीत उमटे धरणातून पाणीपुरवठा होत आहे. मात्र राजकीय व शासकीय उदासीनतेमुळे धरणात मागील 40 ते 45 वर्षांपासून गाळ साचलेला आहे. धरणातील पाण्याची पातळी खूप कमी झाल्यामुळे या धरणावर अवलंबून असणार्‍या गावांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. तसेच धरणातील पाणी अत्यंत दुषित व पिण्यास अयोग्य झाले आहे. या धरणावर अवलंबून असणार्‍या गावांना त्वरित टँकरने पाणीपुरवठा करावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

तहसीलदारांना सूचना देऊन तेथील पाहणी करून  लवकरच टँकर सुरू होऊन जनतेचे पाण्याअभावी होणारे हाल थांबविण्यासाठी प्रशासन प्रयत्न करेल असे आश्वासन उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे यांनी दिले.

2016-17 पासून उमटे धरणाचा गाळ काढून धरणाच्या संरक्षण भिंतीची भगदाडे भरावीत यासाठी उमठे धरण क्षेत्रातील ग्रामस्थांनी शासनाला वारंवार विनंती अर्ज दिले. मात्र शासनाने नकारात्मकतेची भूमिका घेवून धरणाचा गाळ न काढता लोकांच्या भावनेची चेष्टाच केली आहे. शासनाच्या जलजीवन मिशनची ऐशी की तैशी झालीय. प्रत्येक नागरिकाला दैनंदिन शुद्ध व मुबलक पाणीपुरवठा करण्याचा शासन आदेश इथं धुळीत मिळालाय अशी टीका  अ‍ॅड.  महेश मोहिते यांनी केली.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply