Breaking News

भाऊचा धक्क्यावरील प्रवेशद्वार रात्रीपर्यंत सुरू ठेवण्याची मागणी

उरण : प्रतिनिधी

प्रवासी, मच्छीमार, व्यावसायिकांच्या रेट्यानंतर भाऊचा धक्क्यावरील बीपीटीने बंद केलेले प्रवेशद्वार अखेर शनिवारपासून सकाळी 11 ते 5 यादरम्यान खुले करण्यात आले असले तरी त्यानंतरही प्रवाशांची होणारी गैरसोय दूर झाली नाहीये. त्यामुळे हे प्रवेशद्वार सकाळपासून रात्रीपर्यंत खुले ठेवण्याची मागणी मुंबई जलवाहतूक संस्था तसेच प्रवाशांकडून केली जात आहे. शासनाने 1 जुन ते 31 जुलै 2022पर्यंत खोल समुद्रातील पावसाळी मासेमारी बंदीचे आदेश जारी केले आहेत. पश्चिम तटवर्ती समुद्री क्षेत्रातील 61 दिवसांच्या बंदीमुळे राज्यातील खोल समुद्रात मासेमारी करणार्‍या हजारो मच्छीमार बोटी विविध बंदरात विसावल्या आहेत, मात्र माशांच्या प्रजनन काळात बंदी आदेशानंतरही अवैधरित्या होणारी मासेमारी रोखण्याच्या आदेशानंतर मुंबई पोर्ट ट्रस्टने भाऊचा धक्का येथील प्रवेशद्वाराला टाळे ठोकले होते. अचानक बंद करण्यात आलेल्या प्रवेशद्वारामुळे दररोज प्रवास करणार्‍या सुमारे चार हजार प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जाण्याची वेळ आली होती, मात्र मुंबई पोर्ट ट्रस्टने अचानक भाऊचा धक्का येथील प्रवेशद्वारच बंद केल्याने बस, टॅक्सी, ट्रक, टेम्पो वाहतूक बंद पडल्याने या मार्गावर प्रवास करणार्‍या  सुमारे चार हजार प्रवासी, मच्छीमार, व्यावसायिकांची भाऊच्या धक्क्यावरूनच सामान ने-आण करण्यासाठी मोठी समस्या निर्माण झाली होती. प्रवासी संघटना, विविध मच्छीमार संस्था, वाहतूकदार संघटना यांच्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा न करताप्रवासी, मच्छीमार, व्यावसायिकांसाठी उपयुक्त ठरणारे भाऊच्या धक्क्यावरील बंद करण्यात आलेले प्रवेशद्वार त्वरित सुरू करण्याची मागणी मोरा कोळीवाडा मच्छीमार सहकारी संस्थेने मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि यलोगेट गेट पोलीस ठाण्याकडे लेखी तक्रारी पत्रातून संस्थेचे अध्यक्ष प्रवीण कोळी यांनी केली होती. प्रवासी, मच्छीमार, व्यावसायिकांच्या रेट्यानंतर भाऊच्या धक्क्यावरील बीपीटीने बंद केलेले प्रवेशव्दार अखेर सकाळी 11 ते पाच वाजेपर्यंत खुले करण्यात आले आहे, मात्र त्यानंतरही प्रवाशांची होणारी गैरसोय दूर झालेली नाही. त्यामुळे हे प्रवेशद्वार सकाळपासूनच रात्रीपर्यंत खुले ठेवण्याच्या मागणीसाठी नुकतीच मुंबई जलवाहतूक संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी मुंबई मेरिटाईम बोर्डाच्या अधिकार्‍यांची भेट घेऊन समस्यांची माहिती करून दिली.

जलमार्गावर प्रवासीसंख्या अधिक

भाऊचा धक्का-मोरा हा जलमार्ग पावसाळ्यातही प्रवाशांसाठी खुला असतो. त्यामुळे  दरवर्षी पावसाळी हंगामात गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा-अलिबाग, भाऊचा धक्का ते रेवस, जेएनपीटी या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूकही बंद ठेवण्यात येते. त्यामुळे जेएनपीटी, मांडवा-अलिबागकडे जाणार्‍या प्रवाशांची मोरा-भाऊचा धक्का या सागरी मार्गावर गर्दी वाढते. त्यामुळे या सागरी मार्गावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या मोठी आहे.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply