Breaking News

खारघर शहराला पाणीपुरवठा वाढला

भाजपच्या सिडको काम बंद आंदोलनाला यश; आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह पदाधिकार्‍यांचे नागरिकांनी मानले आभार

खारघर : रामप्रहर वृत्त

सिडकोने वसविलेल्या खारघरमध्ये भीषण पाणीटंचाईची समस्या उद्भवली होती. यासाठी अनेक पत्रव्यवहार सिडकोकडे भाजपकडून करण्यात आले. याकडे सिडकोने दुर्लक्ष केल्याने नागरिकांच्या या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी व सिडको प्रशासनाला जागे करण्यासाठी भाजपच्या खारघरमधील शिष्टमंडळाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सिडको काम बंद आंदोलन केले. काही दिवसांपासून खारघर शहराला मुबलक पाणीपुरवठा होऊ लागला आहे. त्यामुळे नागरिक आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह भाजप पदाधिकार्‍यांचे आभार मानत आहेत.

मागील अनेक महिन्यांपासून खारघर शहराला भीषण पाणीटंचाई जाणवत होती.  यासाठी खारघर भाजपाच्यावतीने अनेक आंदोलने, निवेदने व मोर्चे काढले गेले होते. खारघर शहराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे, त्यातच नवनवीन गृहसंकुले निर्माण होत आहे; परंतु त्या प्रमाणात नागरिकांना पाणी पुरवठा मिळत नव्हते. शेवटी पनवेल विधानसभेचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वात 6 मे 2022 रोजी सिडकोचे काम बंद आंदोलन करण्यात आले. त्यापूर्वी गोल्फ कोर्समध्ये सिडको अधिकार्‍यांना घेराव घालण्यात आला होता. ही बाब सिडकोने गांभीर्याने घेऊन ही समस्या लवकर लवकर दूर करण्याचे आश्वासन दिले होते. या दरम्यान खारघर भाजपाचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी हेटवणे धरणात सुरू असलेल्या कामाचा दररोज आढावा घेत होते. यासाठी सिडकोने तीन जूनला दोन दिवसीय शटडाऊन घेतले होते व हळूहळू हेटवणे धरणातून पाण्याचा दाब वाढवून पाणीपुरवठा सोडला जात होता.

मागील पाच दिवसांपासून पाणी योग्य प्रमाणात येत असल्याचे पाणीपुरवठा सिडको विभागाकडून समजले होते. बुधवारी (दि. 15) खारघर सेक्टर 11मधील एमबीआरला सर्व नगरसेवक व पदाधिकारी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन रजिस्टरमधील रोजच्या पाण्याची नोंद तपासून पाहिली. शटडाऊन पूर्वी व शटडाऊन नंतरच्या प्राप्त झालेल्या नोंदींमध्ये समाधानकारक फरक दिसून आला. सुमारे पंधरा दशलक्ष पाणी वाढल्याचे दिसून आले तसेच मागील पाच दिवसांपूर्वी खारघर शहराला दररोज 120 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा होत असे, तो आता दिवसाला पंधरा टँकरने होत असल्याचे नोंदीतून समजले.

ज्या सोसायट्यांना अजूनही टँकरने पाणी होत आहे, अशा सोसायटीमध्ये काही तांत्रिक दोष आहे का? याची तपासणी करण्याची सूचना सिडको अधिकार्‍यांना देण्यात आल्या.

या वेळी खारघर भाजप अध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेवक नरेश ठाकूर, प्रवीण पाटील, शत्रुघ्न काकडे, रामजी बेरा, नीलेश बाविस्कर, नगरसेविका हर्षदा उपाध्याय, आरती नवघरे, नेत्रा पाटील, सरचिटणीस दीपक शिंदे, किर्ती नवघरे, उपाध्यक्ष दिलीप जाधव, बीना गोगरी, संजय घरत, जिल्हा चिटणीस गीता चौधरी, प्रतीक्षा कदम, समीर कदम, अमर उपाध्याय, गुरुनाथ गायकर, वैशाली प्रजापती, गुरुनाथ म्हात्रे, गिरीश गुप्ता, शैलेंद्र त्रिपाठी आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply